मुक्तपीठ टीम
बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच BROच्या प्रयत्नांमुळे जगातील सर्वात उंच वाहनयोग्य रस्ता भारतात बांधण्यात आला आहे. BROने भारताच्या उत्तरेकडील सीमेवरील अत्यंत दुर्गम भागात रस्ते बांधण्याचे कौशल्य उपयोगात आणत हा विक्रम साध्य केला आहे. गेले काही महिने सुरु असलेले काम आताच संपलं आङे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला ही कामगिरी यशस्वी झाली आहे. बीआरओ ही भारतीय सशस्त्र दलांसाठी रस्ते बांधणी संस्था आहे.
जगातील सर्वात उंच रस्ता ज्यावर मोटार वाहने चालवता येतात तो १९ हजार ३०० फूट उंचीवर आहे. पूर्व लडाखमधील उमलिंग ला पास येथे या उंच पर्वतीय खिंडीतून BROने ५२ किमी लांबीचा पक्का रस्ता बनवला आहे. उमलिंग ला पास रस्ता पूर्व लडाखच्या चुमार सेक्टरमधील महत्त्वाच्या शहरांना जोडतो.
भारताने कोणाचा विक्रम मोडला?
उमलिंग ला पासने आता बोलिव्हियामधील १८ हजार ९५३ फूट उंचीचा विक्रम मोडला आहे. बोलिव्हियातील शेवटचा सर्वात उंच रस्ता उतुरुंकू नावाच्या ज्वालामुखीला जोडतो.
माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा उंच
- या रस्त्याची खरी स्थिती अशा प्रकारे समजू शकते की तो माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा उंच आहे.
- तिबेटमधील उत्तरेकडील तळ १६ हजार ९०० फूट उंचीवर आहे, तर नेपाळमधील दक्षिणेकडील तळ १७ हजार ५९८ फूट उंचीवर आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २९ हजार फूट उंच आहे.
- स्थानिक जनतेला वरदान
- संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्थानिक लोकांसाठी हे वरदान ठरेल कारण लेह ते चिसुमले आणि डेमचोकला जोडणारा हा पर्यायी थेट मार्ग बनला आहे. यामुळे सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल आणि लडाख मध्ये पर्यटनाला चालना मिळेल.”
चालकांसाठी अधिक आव्हानात्मक
- प्रसिद्ध खारदुंग ला पासपेक्षा उमलिंग ला पास चालकांसाठी अधिक आव्हानात्मक असेल.
- या पासचे तापमान तीव्र थंडीच्या काळात उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.
- तसेच, या उंचीवर ऑक्सिजनची पातळी सामान्य स्थानांपेक्षा सुमारे ५० टक्के कमी आहे.
- त्यामुळे येथे जास्त काळ राहणे कुणालाही अवघड झाले आहे.
BROचे कौशल्य आणि परिश्रम
मंत्रालयाने म्हटले आहे की, बीआरओने धोकादायक भागात आणि अत्यंत हवामानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संयम आणि कौशल्यामुळे ही कामगिरी केली आहे.
पाहा व्हिडीओ: