मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार, पत्नीची तंबाखू खाण्याचे व्यसन जरी वाईट असली तरीही तिला घटस्फोट देण्यासाठी हे कारण पुरेसे नाही, असे मत व्यक्त करीत खंडपीठाने २१ जानेवारी २०१५ रोजी नागपूर फॅमिली कोर्टाने दिलेला निर्णयही फेटाळून लावला.
न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठाने निकाल दिला की, पतीने केलेले आरोप सामान्य आहेत. पत्नीला तंबाखू खाण्याची सवय असल्याने पत्नीवर उपचार करण्यासाठी बरीच रक्कम खर्च करावी लागली, असे पतीचा आरोप आहे. परंतु पतीने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावा म्हणून वैद्यकीय कागदपत्रे आणि बिल रेकॉर्ड न्यायालयात सादर केले नाहीत.
घटस्फोट घेण्यासाठी पतीने दिलेले कारण गंभीर नाही. घटस्फोट घेतल्यास त्यांच्या मुला-मुलीचे मोठे नुकसान होईल आणि त्यांच्या संगोपनावर परिणाम होईल. दोन्ही मुलांच्या हितासाठी वैवाहिक बंधन राखणे आवश्यक आहे.
या जोडप्याचे १५ जून २००३ रोजी लग्न झाले होते. काही दिवसानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल केला. पतीने घटस्फोटाचे कारण पत्नीला तंबाखू चघळण्याची सवय असल्याचे समोर आणले. तसेच ती घरातील कामेही करत नाही, भांडत राहते असेही आरोप केले होते.
न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “हे आरोप विवाहित जीवनातील कुरबुरींचा एक भाग आहे.” मानसिक क्रूरतेच्या कारणावरून पतीने घटस्फोट घेण्याची मागणी केली पण त्याला ते सिद्ध करता आले नाही. याउलट त्याने कबूल केले की, २००८ मध्ये तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. तरीसुद्धा पत्नी २०१० पर्यंत त्याच्यासोबत राहिली.
हायकोर्टाने काही जुन्या निकालांचा हवाला देत म्हटले आहे की, विवाहित जीवनाचे संपूर्ण मूल्यांकन केले पाहिजे, क्षुल्लक कारणांवरून क्रूरता सिद्ध केली जाऊ शकत नाही.