मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र शासनाने ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन साजरा करण्याविषयी निश्चित केले. त्याच अनुषंगाने गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शिवस्वराज्य दिनाचे आभासी पध्दतीने आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे, इतिहास विभाग प्रमुख,ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासे यांना आमंत्रित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या संवगड्यासह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. यासाठी जिजाऊ माँसाहेब यांचे संस्कार, प्रेरणा व आशीर्वाद महाराज्यांच्या पाठीशी होते. या सर्व सामर्थ्याने अनेक गड किल्ले जिंकून ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून कायद्याचं स्वराज्य स्थापन केले.
प्रमुख वक्ते डॉ. सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना शाहाजी राजे राजे जाहागिरदार होते पण राजे नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र स्वराज्य स्थापन करायचे होते. त्यांनी अनेक गड किल्ले जिंकत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या समोर आव्हाने निर्माण केले. मात्र महाराजांना रयतेचे सार्वभौमत्वाचे, कायद्याचे स्वराज्य निर्माण करावयाचे होते म्हणून ऐन पावसाळ्यात ६ जून १६७४ रोजी अंत्यंत भव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न केला. आणि खऱ्या अर्थाने रयतेचे छत्रपती बनले.
रयतेचं स्वराज्य निर्माण केले. हे जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणारी घटना असल्याचे सांगितले. शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगही त्यांनी जिवंत केले. अफजल खान, शाहिस्तेखान, पुरंदरचातह, आग्र्याहून सुटका या प्रसंगातून महाराजांच्या मुसद्दीपणाचे दर्शन घडविले. डॉ. आर एन पवार यांनी पाहूण्याचा यथोचित सन्मान व परिचय करून दिला. प्रा. दिपक वाकडे यांनी सूत्रसंचालन करताना शिवस्वराज्य दिवसाचं महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला जवळपास १०० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.