मुक्तपीठ टीम
मराठी माणूस ठरवलं तर जिद्दीनं आपल्याच मातीत स्वर्ग उभारू शकतो. तुम्ही कधी पालघरला गेलात तर घोलवडमध्ये वसलेल्या ‘तारपा अॅग्रो-इको टूरिझम’ या सेव्ह फार्मच्या उपक्रमाला नक्की भेट द्या. ‘तारपा’ हा शब्द स्थानिक आदिवासी समुदायाद्वारे ‘वारली’ या नावाने वापरल्या जाणार्या वाद्यपासून आला आहे. तारपा विकसित करणाऱ्या सावे कुटुंबानं शेती, फळबागांमधील वेगळ्या प्रयोगांबरोबरच इतरही अनेक वेगळे अभिनव प्रयोग केले आहेत. सध्याचा हा नवा प्रयोग व्हायरल व्हिडीओंमुळे कौतुकाचा विषय झाला आहे.
व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडीओत दिसते हिरव्यागार परिसरातून थाटात येणारी गाडी. चालणारे प्रभाकर सावे. पालघर जिल्ह्यातील घोलवडच्या तारपा अॅग्रो-इको टूरिझमचे प्रणेते. प्रभाकर सावे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य सावे यांना लॉकडाऊनमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चालवणारे मिळत नव्हते. त्यांच्या ३५ एकरांच्या परिसरात पिकलेली फळे, इतर शेतीमाल, नर्सरीची रोपे विक्री केंद्रावर आणण्याची समस्या निर्माण झाली. तेव्हा त्यांनी डोकं लढवलं. घरातील १५ वर्षे जुनी वापरात नसलेली बजाज पल्सर मोटर सायकलीला सुरुवातीला स्कुटरची चाके लावून ही ट्रॉली गाडी तयार केली. त्यानंतर मोटर सायकलीची चाके वापरून तिची क्षमता वाढवली. व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओत ती गाडी दिसते. आज त्यांच्या या मोटर सायकल गाडीमुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. गाडी जुनी झाली. भंगारात काढू नका. तिला दुरुस्त करा. ट्रॉली जोडा. आपल्या परिसरात वाहतुकीसाठी वापरा.
आपली माती, आपलं तारपा
- त्यांच्या शब्दात सांगायचे तर शेती पर्यटन संकल्पना शेतकरी व निसर्गप्रेमी शहरी लोकांमध्ये लोकप्रिय करण्या हे आमचे उद्दीष्ट आहे.
- आम्ही आमच्या अतिथींना शाश्वत सेंद्रिय शेती पद्धती, श्रीमंत आदिवासी संस्कृती आणि ग्रामीण जीवन या सर्वांचा परिचय करून देत आहोत, त्या सर्व गोष्टी फक्त भारतीय ग्रामीण भागात आढळतात.
- ‘तारपा’ हे पारंपरिक हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही तर हे असे पर्यटन स्थळ आहे जिथे एखादे पर्यटन ‘अनुभव’ घेता येते!
तारपाच्या सावे फार्मच्या वेबसाइटवरून, शेताच्या आभासी सहलीचा अनुभव घेता येऊ शकतो. आपणास येथे होणार्या विविध शेती व पर्यटन कार्याची झलक मिळू शकेल. त्यानंतर नक्कीच तुम्हीही ठरवालच सावे फार्मला भेट द्यायचीच द्यायची.