मुक्तपीठ टीम
गणित, विज्ञान या विषयांबद्दल फारशी आस्था नसलेले विद्यार्थी आणि यात रुची नसलेल्या पालकांनाही ‘विज्ञाना’विषयी भरपूर ‘ज्ञान’ नक्कीच मिळेल, असा ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव मंगळवारी, २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात हा अनोखा महोत्सव आयोजिण्यात आहे. विज्ञान प्रसारची सहयोगी संस्था म्हणून साठ्ये महाविद्यालयाची या महोत्सवाच्या आयोजनाकरिता निवड झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी पत्रकारांना शनिवारी येथे दिली.
‘मेंदूला ज्ञानाचा खुराक’ मिळणारे विज्ञानविषयक चित्रपट, नाटके, एकांकिका, व्याख्याने, स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची लयलूट या अनोख्या महोत्सवात आहे, आयोजनाची जबाबदारी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या विज्ञान प्रसार या स्वायत्त संस्थेकडे सोपविली आहे.
महाविद्यालयाच्या वेबसाइटवर या कार्यक्रमाचे संपूर्ण आठवडाभराचे वेळापत्रक आणि त्यांतील प्रवेशासाठी नोंदणीची व्यवस्था आहे. विज्ञानप्रसाराला एकाच वेळी मोठी चालना देण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागारांचे कार्यालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांचाही मोलाचा सहभाग आहे.
याचे निमित्त आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ! गेल्या २० वर्षांपासून भारताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. त्याची ख्याती परदेशांतील शास्त्रज्ञांपर्यंतही पोहचली. या क्षेत्रातील विविध अवघड टप्पे अनेक शास्त्रज्ञ, महाविद्यालयीन- शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सोप्या शब्दांत लिलया उलगडले. त्यामुळेच भारतीय विज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडविणा-या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष पेडणेकर यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता साठ्ये महाविद्यालयात होणार आहे. टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) तज्ज्ञांद्वारे ‘घर नावाची प्रयोगशाळा ’ या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही त्याच दिवशी केले आहे आणि सायंकाळी ५ वाजता प्रसाद वनारसे यांचा ‘डार्विन’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम पुढील आठवडाभर होतील. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. मात्र, कोविड निर्बंध लक्षात घेता आगाऊ नोंदणीनेच प्रवेश देण्यात येतील, असे डॉ. राजवाडे यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचाही यात सहभाग आहे. देशातील ७५ शहरांत एकाच वेळी ७५ विविध प्रकारचे वैज्ञानिक कार्यक्रम होतील. या अमृतमहोत्सवी सोहळ्यात संरक्षण, अवकाश, आरोग्य, कृषी, खगोलशास्त्र आणि भारताची शास्त्रीय महत्ता व तांत्रिक क्षमता यांचे दर्शन देशवासियांना घडणार आहे. आठवडाभरात व्याख्याने, चर्चासत्रे, चित्रपट, नाटक, पुस्तक प्रदर्शने, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा अशा विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचा सहभाग यात आहे.
महाविद्यालयाने निबंध लेखनापासून प्रकल्प सादरीकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ स्पर्धांचे आयोजन केले. त्याचा पारितोषिक वितरण महोत्सवाच्या समारोप समारंभात २८ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता रोजी होईल.