मुक्तपीठ टीम
कोरोनाची साथ नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी काय केले? असा घणाघाती सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज उपस्थित केला.
आज कृषि दिनानिमित्त दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून दरेकर म्हणाले. राज्यातील शेतकरी आज अनेक संकाटातून जात आहे. हजारो निराशावादी शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. राज्यात बी बियाणे उपलब्ध होत नसून खताची अडचण, हमीभाव दिला गेला नाही. एकंदरीत आजचा शेतकरी अडचणीत आहे. खतांची दरवाढ झाली त्यावळेस केंद्राने मदत केली असून दरवाढ कमी करण्यात आली. केंद्राकडून शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या गेल्या. परंतु राज्यात अजूनही आर्थिक दृष्ट्या शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळेला आपण शेतकऱ्यांना काय दिले, काय प्रगती केली असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला?
राज्यांमध्ये कोणतेही पॅकेज का नाही?
पवार साहेब यांचे कृषि क्षेत्रात फार मोठे योगदान असल्याचे भुजबळ यांनी वक्तव्य केले यावर दरेकर म्हणाले, पवार साहेब कृषिमंत्री होते त्यांचे महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात मोठे योगदान आहे. योगदान विषयी आणि शेतकरी अडचणीत असल्यावरून जोड तोड करण्याची आवश्यकता नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला. कोरोना संकट काळात केंद्राकडून सर्व सामान्य लोकांना पॅकेज देण्यात आले, मदतीचा हात पुढे करण्यात आला. शेतकरी, मजूर, कामगार, बेरोजगार किंबहुना छोटे घटक किंवा छोटे व्यावसायिक यांना केंद्राकडून मदत करण्यात आली. अनेक राज्याने आपली पॅकेज केंद्राला अनुसरून जाहीर केली असून, त्यामध्ये कर्नाटक, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्य आहे. परंतु तरीही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी का कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आले नाही असा सवाल दरेकर यांनी विचारला.
आलं अंगावर ढकला केंद्रांवर
केंद्राने ६ लाख २८ हजार कोटीचं पॅकेज जाहीर करत उद्योगजगताला दिलासा देण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, छोट्या उद्योगजतासाठी हे पॅकेज निश्चितपणे दिलासा देईल. पर्यटन उद्योगासाठी १० लाख विनातारण कर्ज दिलं. कोरोना संकट काळात अनेक छोटे पर्यटन उद्योग अडचणीत सापडले आहेत, छोटे उद्योगांना २ टक्के व्याजदार आणि सव्वा लाख कर्ज केंद्र सरकार देणार आहे. छोटे उद्योगधंदे टिकावे, बेरोजगारी कमी व्हावी. पुनः अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी हीच या मागची भावना आहे. महाराष्ट्र उद्योगशील राज्य आहे. उद्योगांसाठी काय केलं, बेरोजगरांसाठी काय केलं, त्यांच घर कशाप्रमाणे चालतय हे राज्यसरकार पाहत नाही. त्यामुळे आपला नाकर्तेपणा लपवत आलं अंगावर ढकला केंद्रांवर अशी भूमिका राज्यसरकार घेत आहे.
पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, तपास करावा
गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणं दुर्दैवी आहे. नेते जर आपल्या भूमिका मांडत असतील तर ते योग्य आणि अयोग्य हे देशातील लोकं ठरवतील. पण शेकडोच्या संख्येने अनेक गरीब, उपेक्षित समाज आहे. त्यांना संघटित करत त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आज बहुजन समाजातील नेता पुढे येत महाराष्ट्रभर फिरत आहे. पण त्यांची अडवणूक कोण करत आहे, याचा सुद्धा तपास करावा अशी मागणी दरेकर यांनी केली.