मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दोन नवीन न्यायाधीशांच्या नावांच्या केलेल्या शिफारसीवरून न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जमशेद बी पार्डीवाला यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यामुळे ३० महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची पूर्ण क्षमता पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायमूर्ती विनीत शरण हे १० मे रोजी निवृत्त होत आहेत.
नोव्हेंबर २०१९ नंतर प्रथमच, ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या मंजूर पदांच्या बरोबरीची असेल, म्हणजेच ३४. मात्र, न्यायमूर्ती शरण १० मे रोजी निवृत्त झाल्यानंतर ही संख्या ३३ वर येईल. याशिवाय न्यायमूर्ती एल नागेश्वर राव हे देखील ७ जून रोजी निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती एएम खानविलकर २९ जुलै रोजी निवृत्त होत आहेत, तर सरन्यायाधीश (CJI) एनव्ही रमणा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात आणखी तीन पदे रिक्त असतील. इतकेच नाही तर न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी या वर्षी २३ सप्टेंबरला तर न्यायमूर्ती यूयू ललित ८ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आणखी सहा न्यायाधीश या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत.
उत्तराखंडचे न्यायमूर्ती धुलिया
- न्यायमूर्ती धुलिया हे उत्तराखंडमधील पौरी-गढवालमधील मदनपूर या दुर्गम गावातील आहेत.
- १० ऑगस्ट १९६० रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती धुलिया यांचे प्रारंभिक शिक्षण देहरादून आणि अलाहाबाद येथे झाले.
- त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
- ते १९८६ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बारमध्ये रुजू झाले आणि २००० मध्ये उत्तराखंडच्या निर्मितीनंतर ते गृहराज्यात गेले.
- २००४ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- नोव्हेंबर २००८ मध्ये पदोन्नती झाली आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
- ते नंतर आसाम, मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश होते.
कोण आहेत न्यायमूर्ती जमशेद बी पार्डीवाला?
- न्यायमूर्ती पार्डीवाला २०२७ मध्ये सरन्यायाधीश होणार आहेत
- १२ ऑगस्ट १९६५ रोजी मुंबईत जन्मलेल्या न्यायमूर्ती पार्डीवाला यांचे शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावी वलसाड (दक्षिण गुजरात) येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले.
- त्यांनी वलसाडच्या जेपी आर्ट्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
- त्यांनी १९८८ मध्ये केएम मुलजी लॉ कॉलेज, वलसाड येथून कायद्याची पदवी पूर्ण केली.
- न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी १९९० मध्ये गुजरात उच्च न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली.
- न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्यानंतर २०२७ मध्ये न्यायमूर्ती परडीवाला हेही सरन्यायाधीश होतील.