Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

March 3, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

तुळशीदास भोईटे

देव आपणच घडवायचा. त्यावरचा शेंदूर खरवडवून खरं रुप समोर आणायचं तेही आपणच. हे सारं घडतं-बिघडतं ते ट्विटरवर. सध्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं लोकल ते ग्लोबल असंतोष उफाळलेला असताना सर्वाधिक शक्तिशाली, प्रभावी जर काही ठरलं असेल तर ते कोणतंही प्रस्थापित माध्यम नाही तर फक्त आणि फक्त ट्विटरच!

रिहाना एक पॉप सिंगर. हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये अभिनयही. तरीही भारतात एका वर्गाबाहेर माहिती नव्हती. आता मात्र तिच्या एका ट्वीटमुळे ती भारतीय मोबाइल मोबाइलमध्ये आणि त्यामुळेच घरा-घरात पोहचली. तेच स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग या ग्लोबल कन्येचं. पर्यावरण रक्षणासाठी तिने किशोरावस्थेच एल्गार पुकारला. थेट अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशीही पंगा घेतला. तरीही तिच्याबद्दलही भारतीयांमधील फार मोठ्या वर्गाला माहित होतं असं नाही. आता मात्र तिनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा काय दिला, तिचे नाव अगदी माहितीसह भारतीयांच्या ओठी रुळले. हे सारं घडलं ते ट्विटरमुळे. ट्विटरवर त्या अभिव्यक्त झाल्या. त्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलनविरोधक विखारी पद्धतीने अभिव्यक्त झाले. काही ग्लोबल ख्याती असणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींनाही अचानक लोकल हित आठवून देशाच्या कारभारातील हस्तक्षेप असल्याचा साक्षात्कार झाला. मात्र, त्यांच्या मोहिमेनंतरही सामान्य भारतीयांनी त्यांचा शेंदूर खरवडत त्यांचीच खरडपट्टी काढली. हे सारं घडलं ते माध्यम आहे ट्विटर!

ज्याच्याविषयी अन्य वेळी कोणी चकार शब्दही उच्चारला तर थेट हमरी-तुमरी येणारे लाखोच नाही तर कोट्यवधी थेट त्या देवाच्याच विरोधात मैदानात उतरले ते अन्य कुठले मैदान नव्हते ते होते ट्विटरचेच! क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनातील एका साध्या वाटणाऱ्या ट्विटमुळे हा अनुभव घेतला.

सध्या प्रस्थापित माध्यमं ही मोठ्या सेलिब्रिटींचे विषय आले की जरा जपूनच असतात. कारण प्रस्थापित माध्यमे त्यांच्या मुलाखती, बाइट, इव्हेंटमधील त्यांची उपस्थिती यासाठी त्यांचे गुलाम होण्यास तयार असतात. त्यातूनच मग विरोधातील साधी बातमीही चालत नाही. पण जेव्हा हेच सेलिब्रिटी वादात अडकतात, तेव्हा हीच प्रस्थापित माध्यमं जाळ्यात अडकलेल्या सिंहाला माकडंही वाकुल्या दाखवतं, एखादा भेकडही खडे मारतो, तसे वागतात. हे सेलिब्रिटी सिंह जाळ्यात नसतात तेव्हा त्यांच्याविरोधात उभे ठाकतात ते ट्विटरकरच. अर्थात साऱ्यांचेच हेतू शुद्ध असतात असं नाही.

ये पब्लिक है सब जानती है…कधी तरी कोणीतरी सहजच लिहिलेलं. आज सर्वार्थानं खरं ठरलेलं. तुम्ही ट्विटरवर असा किंवा नसा. तुम्हाला सर्व काही कळत असतं. प्रस्थापित माध्यमांनी अगदी ठरवलं तरी त्यांना लोकल ते ग्लोबल काहीच दाबता येत नाही. त्यांनी दाबलं तरी ते ट्विटरवर ट्रेंड होतं आणि मग प्रस्थापित माध्यमांना दखल घ्यावीच घ्यावी लागते. त्यामुळेच या निमित्तानं २८० कॅरेक्टरची मर्यादा असलेल्या ट्विटरच्या अमर्यादित प्रभावाच्या जगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न आहे.

टिव टिव करणारं ट्विटर आहे तरी काय?

ट्विटर ही एक मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया सेवा आहे. २००४मध्ये फेसबूक आलं. त्याने पूर्वीच्या ऑर्कूटला संपवलं. त्यानंतर २०१६मध्ये ट्विटर आलं. फेसबूकपेक्षा स्वरुप वेगळं असल्यानं वेगळं अस्तित्व मिळवलं. त्यातही सध्याच्या पिढीला जास्त मोठं करण्यासाठी, वाचण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे फक्त १४० कॅरेक्टर्समध्ये अभिव्यक्त व्हायचं बंधन सांगितलं. म्हटलं तर ते बंधन पण तेच ट्विटरचं बळ ठरलं. झटपट अभिव्यक्त होता येत असल्यानं मोठ्या वर्गानं ट्विटरला आपलंसं केलं. पुढे अकरा वर्षांनी २०१७च्या नोव्हेंबरात ती मर्यादा दुप्पट म्हणजे २८०वर नेण्यात आली. आजही ऑडियो – व्हिडीओसाठी मात्र १४० सेकंदांची मर्यादा तशीच कायम आहे. बहुधा  नव्या पिढीलाच नव्हे तर अतिव्यग्र जीवन जगणाऱ्या कोट्यवधींना कॅरेक्टर्स मर्यादा बंधन न वाटता ‘सिधी बात, नो बकवास’ असं धोरण वाटलं असावं. त्यामुळे झपाट्यानं वाढत ट्विटर कोट्यवधींनी आपलंस केलं. आता कोरोना संकटात तर ट्विटर अधिकच पुढे गेले. त्यातही सर्वांना भावलं ते कुठल्याही दबावाखाली न येता ट्विटरने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही खाते स्थगित केले. त्यांच्या ट्वीटवरही फेक न्यूज किंवा मिसइन्फॉर्मेशनचा शिक्का मारला. हे करण्यासाठी माध्यमांकडे जी हिंमत लागते ते ट्विटरने अमेरिकेत तरी दाखवली!

ट्विटर हँडल

ट्विटरवर इमेलचा वापर करत खाते उघडता येते. त्यासाठी जे नाव मिळवले जाते ते त्या व्यक्तीचे ट्विटर हँडल असते. अनेकदा मोठ्या व्यक्तींशी साधर्म्य असणारे हँडल मिळवून फसवणूकही केली जाते. काहीवेळा फक्त फॉलोवर वाढवण्याचा उद्देश असतो.

फॉलोवर

ट्विटरवर या नेत्याचे एवढे कोटी फॉलोवर, त्या सेलिब्रिटीचे तेवढे कोटी फॉलोवर असे ऐकत असाल. ट्विटवर दुसऱ्या हँडलला फोलो करणारे ते फॉलोवर. अनेकदा असे फॉलोवर हे फेक, बेनामी किंवा मानवी अस्तित्व नसलेले बोट्सही असतात.

ट्वीट म्हणजे काय?

फेसबूक किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर त्यांचे वापरकर्ते जे मजकूर-छायाचित्र-व्हिडीओ स्वरुपात जे काही मांडतात त्याला पोस्ट म्हटले जाते. ट्विटरवर त्यालाच ट्वीट म्हणतात. सुरुवातीला १४० कॅरेक्टर्सची मर्यादा होती. ती २०१७च्या नोव्हेंबरपासून २८०वर नेण्यात आली.

टाइम लाइन

ट्विटरवर तुम्ही ज्यांना फॉलो करता, जे विषय निवडता त्यांचे किंवा त्या विषयांशी संबंधित ट्विट तुमच्या पेजवर दिसते त्यालाच टाइमलाइन म्हणतात.

डीएम – डायरेक्ट मॅसेज

ट्विटरकरांना एकमेकांना खाजगी संवादाची सोय म्हणजे डायरेक्ट मॅसेज म्हणजेच डीएम

टॅग

ट्वीटमध्ये जर एखादे छायाचित्र किंवा इमेज स्वरुपात कागदपत्र जोडले असेल तर किमान १० ट्विटर खात्यांना तुम्ही टॅग करू शकता. काहींनी हा ऑप्शन बंद ठेवलेला असतो. त्यांना टॅग करता येत नाही. शक्यतो विषयाशी संबंधित किंवा ज्यांचे लक्ष वेधण्याची इच्छा असते त्यांना टॅग करावे असे संकेत आहेत, ते पाळले जातातच असे नाही. त्यामुळे काहींनी हा ऑप्शन बंद ठेवलेला असतो.

मेन्शन

ट्वीटच्या मजकुरातसोबत तुम्ही इतर खात्यांची नावे जोडता तेव्हा ते मेन्शन करणे असते. तुम्ही ट्विटरवरील कोणालाही मेन्शन करु शकता.

ट्विटर ट्रेंड

आज काय ट्रेंडिंग आहे? सध्या सहजच ऐकायला येतं. आजवर ट्रेंडी, ट्रेंड वगैरे म्हटलं की वाटायचं फॅशन वगैरेसंबंधित असावं. मात्र, आता ट्रेंड म्हटलं की सहजच कळतं ट्विटरवरच काही तरी ट्रेंडिंग असावं. त्यातही जेव्हा जेव्हा सामान्यांचा असंतोष उफाळू लागतो, प्रस्थापितांच्या विरोधात साचलेला लाव्हा उसळू लागतो, सत्तेला हादरा बसू लागतो, तेव्हा तेव्हा आता समोर येतं ते ट्विटरच! या ट्विटरवर एकाच विशिष्ट विषयात विशिष्ट मतं मांडत जेव्हा ट्विटरकर अभिव्यक्त होऊ लागतात, ठराविक वेळेत सातत्यानं त्या एकाच विषयावर ट्वीट सुरु होतात, तेव्हा मोठ्या संख्येनं एकाच विषयाशी संबंधित ट्वीट्सच्या लाटेला ट्विटर ट्रेंड असं म्हटलं जातं.

ट्विटर ट्रेंड हे सामान्य ट्विटरकर एका विशिष्ट समान उद्देशाने तयार करतात. पण दरवेळी तसेच असते असे नाही. काही वेळा काही हितसंबंधित गट त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ट्विटरकरांना प्रोत्साहित करूनही त्यांना पाहिजे असलेले विषय, मुद्दे. त्यांच्या संबंधित हॅशटॅगचा वापर करत ट्रेंडिंगमध्ये आणतात. आपल्याकडे राजकीय पक्षांचे आयटी सेल असे ट्रेंड तयार करतात. पण सामान्यही त्यांना पाहिजे त्या विषयावर ट्रेंड घडवतात.

ट्विटर ट्रेंड हे ट्विटमुळे घडतात. त्यातील शस्त्र असतात शब्दांची. व्हिडीओची. छायाचित्रांची. काही वेळा व्यंगचित्रांचीही. ट्रेंड वॉरच्या रणनीतीचा एक महत्वाचा भाग असतो तो हॅशटॅगचा.

हॅशटॅग

एक साधी खूण पीसी-लॅपटॉपच्या कीबोर्डवर शिफ्ट ३ दाबले की उमटणारी. पण तिच्या पुढे जेव्हा एखादा उद्देश सांगणारे शब्द जोडले जातात. त्यातून साकारतो एक हॅशटॅग. त्या हॅशटॅगचा वापर करून त्या विशिष्ट विषयावर मतप्रदर्शनाचे अनेक ट्वीट होऊ लागले की साकारतो ट्रेंड. आपल्याकडे नगरमधील कोपर्डीचे अमानुष अत्याचार प्रकरण सुरुवातीला दुर्लक्षिले गेले. समाजमाध्यमात ते #नगरचीनिर्भया हॅशटॅगने गाजू लागले. त्यातून आंदोलन वाढत गेले. अखेर त्यातूनच पुढे महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडल्या.

आता शेतकरी आंदोलकांसाठी असेच अनेक हॅशटॅग तयार केले जातात. त्यांना समर्थन देण्यासाठी लाखो उभे ठाकतात. तसेच त्यांना विरोध करण्यासाठी कृषि कायदे समर्थकांकडून वेगळे हॅशटॅग तयार केले जातात. तेही ट्रेंडिंगमध्ये आणले जातात.

बोट्स

ट्विटरवरच नाही तर सध्या सोशलमीडियाच्या क्षेत्रात धुमाकूळ घालणारा शब्द म्हणजे बोट्स अकाऊंट्सचा. बोट्स म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्व नसेलेल्यांचे समाज माध्यम खाते. ट्विटरवरही अशी हजारो नाही तर लाखो बोट्स खाती आहेत. बेनामी खातीच म्हणावी लागतील अशी. या खात्यांचा उपयोग राजकीय पक्ष किंवा हितसंबंधित समुह एखाद्या व्यक्तीचे फॉलोवर वाढवण्यासाठी तसेच लाइक मिळवण्यासाठी करतात. पण त्याचबरोबर ट्विटर ट्रेंड निर्माण करण्यासाठीही बोट्स अकाऊंटचा वापर केला जातो. त्यासाठी काहींनी व्यावसायिक अप्लिकेशन तयार केली असून ठराविक पाहिजे तोच मजकूर ठराविक हॅशटॅगसह एकाच वेळी हजारो खात्यांमधून ट्वीट केला जातो. केवळ ट्रेंडसाठी नाही तर विरोधी विचारांच्या व्यक्तीला किंवा ग्राहकांच्या प्रतिस्पर्ध्याला ट्रोल करून त्रास देण्यासाठीही अशा बोट्स अकाऊंटचा वापर होतो.

ट्रोलिंग

ट्रोलिंग ही ऑनलाइन रॅगिंग आहे, असे म्हटले कर वावगे ठरू नये.

विरोधातील किंवा वेगळ्या विचारांच्या ट्वीटरकराने विरोधातील ट्वीट केले की त्याच्या विरोधी विचारांचे ट्वीटरकर तुटून पडतात. सारे मिळून संबंधिताच्या ट्वीटवर किंवा थेटही ट्वीट करून अतिशय आक्रमकतेने तुटून पडण्यात येते. एक प्रकारे ट्रोलिंग ही ऑनलाइन मॉब लिंचिंगच असते!

ट्विटरच नाही तर सोशल मीडियाची एक नकारात्मक बाजू अशी की तेथे खाते असणारे लाखो प्रत्यक्षात आपली ओळख लपवून वेगळ्याच नावाने खाती चालवतात. त्यामुळे त्यांना असे वाटते की कायदेशीर जबाबदारीतून त्यांची सुटका होईल. त्यामुळे ते भाषेचा वापर, लिहिले त्यातील वास्तव याच्या जबाबरीतून सुटका होते. तसेच आपण जे लिहिले ते खालच्या स्तरावरील टीकेत मोडणारे असले, गलिच्छ असले तरी ते जाणीवपूर्वक तसे लिहितात. कारण त्यांची ओळख ही लपवलेली असते. असे बेनामी ट्वीटरकर नैतिक कायदेशीर बंधनाविना जास्त धोकादायक असतात.

मात्र, दरवेळी ट्रोलिंग हे नकारात्मक विध्वंसकच असते असे नाही. ते सकारात्मकही असते. काही वेळा न्यायासाठीही जबाबदार व्यक्तीला ट्रोल केले जाते. त्यांना योग्य निर्णयासाठी, भूमिका मांडण्यासाठी भाग पाडले जाते. अर्थात सध्या तसे ट्रोलिंग कमी आणि आक्रमक, विध्वंसकच जास्त होताना दिसते.

टुलकिट म्हणजे काय?

स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या  पर्यावरणवादी तरुणीने शेतकरी आंदोलन समर्थनार्थ केलेले ट्वीट भारतात वादाच्या भोवऱ्यात ओढले गेले. तिने आपल्या ट्वीटला एक टुलकिट जोडले होते. पोलिसांनी टुलकिट बनवणाऱ्यांविरोधात १५३-अ, १२० ब अशा कलमांखाली गंभीर गुन्हे नोंदवले. त्यामुळे टुलकिट हा शब्द चर्चेत आला.

टुलकिट म्हणजे एक प्रकारचे डॉक्युमेंट असते.

आंदोलनांच्यावेळी समर्थन कसे मिळवावे, आंदोलनात काय करावे, काय करु नये, काही अडचण आली तर मदत कुठून आणि कशी मिळवावी याच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश टुलकिटमध्ये असतो.

ग्रेटानं आधी एक टुलकिट अटॅच करून ट्वीट केले आणि नंतर ते सुधारीत टुलकिट जोडून ट्वीट केले.

तिच्या टुलकिटमध्ये पुढील सूचना होत्या, असे सांगितले जाते:

  • तुमच्या लोकप्रतिनिधींना कॉल करा
  • तुमच्या सरकारी प्रतिनिधींना ई-मेल करा
  • कृषि कायद्यांविरोधातील ऑनलाइन पिटिशन साइन करा
  • एका मिनिटात साइन केलेली पिटिशन, सरकारी हिंसाचाराचा निषेध करेल आणि भारत सरकारला आंदोलकांचे ऐकण्यासाठी भाग पाडेल.
  • तीन कृषि कायदे रद्द करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्या
  • युनायटेड नेशन्सना लक्ष
  • घालण्याची विनंती करणारी पिटिशन
  • ग्रेट ब्रिटनमधील खासदारांना भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कशी मागणी पिटिशन करावी त्याच्या सूचना
  • त्याचबरोबर शेतकरी आंदोलनातील ट्रॉली टाइम्सची लिंकही दिली होती.
  • “उठा आणि विरोध करा!” या घोषणेनं शेवट केला होता.

आता सर्वात महत्वाचे.

ट्विटरने मर्यादित शब्दांमध्ये अमर्याद अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असले तरीही त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ट्विटर कमालीची दक्षता घेतो. कुणाच्या स्वातंत्र्याचा संकोच नको या धोरणातून ट्विटरवर अनेकदा संबंधित देश, सरकार काही विचारसरणींच्याविरोधात थेट भूमिका घेणारे ट्रेंड चालतात, तेव्हा ट्विटरवर पक्षपाताचा आरोपही होत असतो. पण अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्षांच्याविरोधात उभे ठाकणारे ट्विटर भारतात आता काहीसे मवाळ होताना दिसत आहे. त्याचे कारण भारतातील सरकारची कडक भूमिका. ट्विटर हे भारत आणि भाजपाविरोधात असल्याचा आरोप सातत्याने भाजपच्या आयटी योद्ध्यांकडून केला जातो. त्यासाठी न्यायालयात ट्विटरविरोधात याचिकाही दाखल झाल्या आहेत. सुनावणी सुरु आहे. सरकारी पातळीवरुनही दबाव आणला जात असतो. त्यामुळेच शेतकरी आंदोलन ऐन भरात आले तेव्हा आंदोलनाशी संबंधित शेकडो खाती बंद करण्यात आली.

जाणकारांच्या मते ट्विटरची धोरणे फेसबूकपेक्षा चांगली असली तरीही शेवटी त्यांनाही व्यवसाय करायचा आहे. धर्मार्थ संस्था नाही. चीनसारखा मोठा बाजार हाती नाही. त्यामुळे भारतासारखा मोठा बाजार गमावण्याचा धोका त्यांना पत्करणे परवडणारे नसणार. स्वाभाविकच काही बाबतीत त्या-त्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल धोरणे राबविणे आवश्यक असेल.

असे असले तरीही ट्विटरवरीत शब्दांच्या मर्यादेत मिळणारे स्वातंत्र्य ट्विटरकरांना मर्यादितच वाटते. त्यातून वाट्टेल त्या विषयावर, वाट्टेल तसे अभिव्यक्त होता येत असल्याने एक वेगळीच शक्ती लाभते. नंतर बंधनं येतात ती येतात. पण तोपर्यंत बऱ्याच वेळा उद्देश साध्य झालेला असतो. किमान त्या दिशेने पावले पुढे गेलेली असतात. त्यामुळेच आजही २८० कॅरेक्टर्सवाले ट्विटर ही सत्तेला धडकी भरवणारी महाशक्ती ठरते!

 

tulasidas bhoite

–    तुळशीदास भोईटे ९८३३७९४९६१

–    www.muktpeeth.com  या मुक्तमाध्यम उपक्रमाचे संपादक

–    सोशल मीडिया सल्लागारही म्हणून कार्यरत


Tags: twitterट्विटरतुळशीदास भोईटे
Previous Post

“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं

Next Post

कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

Next Post
kangana ranuat

कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!