मुक्तपीठ टीम
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. महागाईने नागरिक हैराण झाले असून सरकार काही कपात करून दिलासा देतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आज महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारने कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३६ रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे १९ किलो सिलिंडरची किंमत २ हजार १२ रुपये ५० पैशांऐवजी १ हजार ९७६ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. पण घरगुती गॅस सिलिंडरचे दर तसेच आहेत.
नवीन दरानुसार, १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत त्याची किंमत १९७६ रुपयांवर आली असून त्याचीच या आधी २०१२.५० रुपये किंमत होती. याशिवाय मुंबईत १९३६ रुपये कोलकातामध्ये २०९५ रुपये, आणि चेन्नईमध्ये २१४१ रुपयांना उपलब्ध होईल. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आली नसल्याने नागरिकांवरील महागाईची बोजा सध्या कायम असणार आहे.
घरगुती सिलेंडरवर दिलासा नाही!
- तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र कायम आहेत.
- १४.२ किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर त्याच जुन्या किमतीत उपलब्ध आहे.
- ६ जुलै रोजी त्याच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली.
- तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांपर्यंत वाढ केली होती.
- तेव्हापासून त्याची किंमत १ हजार रुपयांच्या पुढे राहिली आहे.