मुक्तपीठ टीम
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांमध्ये बजाज समूहातच नाही तर देशाच्या उद्योग क्षेत्रात राहुल बजाज यांचं योगदान खूप मोठं होतं. त्यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
राहुल बजाज यांचा उद्योगी प्रवास…
- राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला.
- हे सुखवस्तू कुटुंब व्यावसायिक असल्याने घरातच उद्योगी वृत्तीचे बाळकडू मिळाले.
- राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधून झाले.
- त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए ही पदवी मिळवली.
- मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उमेदवारी केली.
- १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.
- ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व२ राज्यसभेचे सदस्य होते.
- राहुल बजाज यांचा विवाह १९७१ साली रुपा घोलप या मराठी तरुणीसोबत झाला.
- या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत.
- औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
राहुल बजाज यांचे नेहरू घराण्याशी घनिष्ठ संबंध
- राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते.
- राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत.
- जमनालाल बजाज हे जवाहरलाल यांचेही खूप जवळचे मित्र होते.
- काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते.
- बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.
- कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते.
- कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं होतं.
- राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले.
१९६५मध्ये राहुल यांच्याकडे बजाज समूहाची सूत्र हाती…
- राहुल बजाज यांनी १९६५ मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली.
- त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली.
- २००५ मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.