मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या फटकळपणासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी चित्रविचित्र वागणाऱ्या बोलणाऱ्या आमदारांना चांगलंच सुनावलं. ते म्हणालेत, पूर्वी विधिमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे आमदारांनी संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना २-२ लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. आमदारांनी त्यांचे प्रतिनिधीत्व केले पाहिजे. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधित्व आपण करत नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे.
अजित पवारांचे शिस्तीचे डोस
- मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा.
- ते उभे असतील तर आम्ही ओलांडून जायचो नाही.
- आता तर आमच्या जागेवर कोणीही येऊन बसतो.
- मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात.
- त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस.
- पण तरीही आमदार काही ऐकत नाहीत.
अध्यक्षपदाचा सन्मान, सभागृहातील वागणं!
- अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते.
- पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो.
- त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही.
- आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा.
- सर्वांनी शिस्त पाळावी. एकमेकाला ओलांडण्याचे तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे, काय आहे, हेच माहीत नसते.
- कसंही ओलांडलं जातं.
- तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोणतरी बोलत असतात.
- सभागृहात आल्यावर अध्यक्षांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो. एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही.
सभागृहाच्या प्रतिमेला तडा!
विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधिमंडळाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत.
त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.