मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने राज्यात पाचवे राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे. पोषण सुधारण्यासाठी अंगणवाडीतल्या लाखो बालकांना आणि मातांना ३० सप्टेंबरपर्यंत ८ रुपयांमध्ये दिवसातून दोनदा जेवण दिले जात आहे. मात्र राज्यातील अंगणवाडी कर्मचारी अपुऱ्या बजेटमुळे बालकांना पुरेसा आहार पुरवू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आजच्या महागाईच्या काळात ८ रुपयांमध्ये महिला व बालकांना दिवसातून दोनदा आहार देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. तर महिला बाल विकास प्रकल्प राज्याच्या आयुक्तांनी यावर तीव्र भूमिका मांडली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शासनावर टीका !!
- पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने पाचवे राष्ट्रीय पोषण अभियान सुरू झाले असून ३० सप्टेंबर रोजी समाप्त होईल.
- या अभियानात महिला व बालकांचा आरोग्य विषयावर लक्ष केंद्रित केले आहे.
- ६ वर्षाखालील सर्व बालके तसेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांचे पोषण सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लक्ष दिले आहे.
- त्यासाठी ‘स्वस्थ भारत’ स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती देखील सुरू केलीय.
- मात्र ८ रुपयांमध्ये महिला व बालकांना दिवसातून दोनदा आहार देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे.
- परिणामी बालकांना पोषण आहारात दिला जाणारा शिरा किंवा लाडू यात कपात करावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
- अंगणवाडीत ४० बालक आहेत तिथे ठेकेदार कमी आहार पुरवतो.
- अंगणवाडीत हजर बालक जरी ४० असले तरी आहार मात्र २० बालकांना पुरेल एवढाच येतो.
- त्या ४० बालकांना अपुरा आहार पुरावावा लागतो.
- जी बालके अंगणवाडीत येऊ शकत नाहीत त्यांना आणि त्यांच्या मातांना घरी जो आहार दिला जातो त्याला टीएचआर अर्थात ‘टेक होम रेशन’ म्हणतात.
- त्यात निकृष्ट दर्जाचे धान्य असते.
- परिणामी अन्नाची चव बेचव होते.
- बालकांचे पोषण होत नाही, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शासनावर टीका आहे.
बालकांना पुरेसा पोषक आहार न मिळण्यामागे अनेक कारणे…
- त्यापैकी मूलभूत म्हणजे बजेट कमी असल्याने महागाई नुसार ते बचत गटांना परवडत नाही.
- एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “काही अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सेविकावर दबाव टाकतात.
- कमी प्रमाणात आहार असेल तर चालवून घ्या.
- त्यामुळे आहार पुरवणारा कमी प्रमाणात आहार देत असेल तर काय करणार.
- तसेच काही अपवादात्मक सेविकाना याबाबत शांत राहावे बोलू नये म्हणून आहार पुरवणाऱ्या ठेकेदारकडून ३०० रुपये दिले जातात.
- मात्र बहुतांश सेविका या प्रामाणिकपणे सर्व कामे करतात.
- आहार निकृष्ट आणि कमी प्रमाणात असेल तर आम्ही काय करणार, अशी भावना त्या व्यक्त करतात.
८ रुपयांत जेवण आजच्या काळात अशक्यच, एम. ए. पाटील
- अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे नेते कॉमरेड एम. ए. पाटील सांगितले की, “दर दिवशी ताज्या गरम भाज्या, वरण भात, तसेच मुरमुरे फुटाणे शेंगदाणे गुळ घालून तयार केलेला ६० ग्रामचा कुरमुरा लाडू, सर्व जेवण नाश्ता काही ८ रुपयात आजच्या महागाईत शक्य नाहीत.
- निव्वळ ६० ग्राम कुरमुरा लाडू करिता ७ रुपये खर्च येतो.
- शासन इतर खर्च जमेत धरत नाही.
- परिणामी केवळ ८ रुपयांत नाश्ता आणि जेवण आजच्या काळात अशक्यच आहे.
- त्यामुळे घोळ निर्माण होतो.
- याला जबाबदार शासन आहे.
- मोदी सरकारने एकूण २०२१-२२ च्या एकूण अर्थसंकल्प तरतुदींच्या केवळ २.४६ टक्के रक्कम पोषण आहारासाठी तरतूद केली आहे.
- मात्र अंगणवाडी पोषण आहारासाठी ३८,००० कोटी रुपयांची तरतूद केली तरच पुरेसा आहार बालक आणि महिलांना देता येईल .
- अन्यथा कुपोषण सुरू राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आयसीडीएस महाराष्ट्र आयुक्तांची प्रतिक्रिया!!
- याबाबत महिला बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, “बजेटमध्ये तरतूद कमी किंवा जास्त याबद्दल तो मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे.
- मात्र राज्यात जर कोणी म्हणत असेल की, आठ रुपयांमध्ये आम्हाला आहार देणे परवडत नाही तर त्यांनी हे काम सोडून द्यावं.
- दुसरे अनेक व्यक्ती आणि समूह आठ रुपयात दोन्ही वेळेचा आहार करण्यासाठी तयार आहेत.
- तसेच जर अंगणवाडीत पोषण आहार देणे आम्हाला परवडत नाही या सबबीखाली आहार प्रमाण कुठे कमी आहार देत असेल आणि दर्जा खराब असेल तर नियमानुसार ते उचित नाही.
- आम्ही याला पायबंद घालू. याची चौकशी करू आणि संबंधितांवर कडक कारवाई करू.