मुक्तपीठ टीम
संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीचे संरक्षण मंत्री पुरस्कार २०२१-२२ साठी अर्ज करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आज ऑनलाईन पोर्टल सुरु केले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने ,संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि भारतीय संरक्षण उद्योगांद्वारे (खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम दोन्ही) स्वदेशीकरण, नवोन्मेष आणि निर्यात क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्याचे , संरक्षण उत्पादन विभाग (डीडीपी ) अंतर्गत गुणवत्ता हमी महासंचालनालयाच्या माध्यमातून (डीजीक्यूए ) व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या संरक्षण मंत्री पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमामुळे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील औद्योगिक पायाचा विस्तार करणे ,खाजगी उद्योगांकडून विशेषतः एमएसएमई/स्टार्ट-अप विभागांमधील ‘दडलेली रत्ने ‘ शोधून काढणे आणि त्यांना इतरांसाठी आदर्श म्हणून प्रोत्साहन देणे सुलभ होणार आहे.
विविध श्रेणीतील संरक्षण मंत्री पुरस्कारांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे (https://rmawards.ddpmod.gov.in) स्वीकारले जातील आणि पुरस्कारांसाठी अर्जांची छाननी प्रक्रियाही ऑनलाइन केली जाईल. २९ सप्टेंबर २०२२ ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.गुणवत्ता हमी महासंचालनालयाचा संरक्षण मंत्री पुरस्कार कक्ष पोर्टल आणि मदत क्रमांक सुविधेचे व्यवस्थापन करेल (ईमेल:- rmawardsmod-dgqa[at]gov[dot]in; दूरध्वनी:- 011-24196951).
गुजरातमधील गांधीनगर येथे १८ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या डेफ एक्सपो-२२ दरम्यान २०२१-२२ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान केले जातील.