डॉ. गणेश गोळेकर
पराक्रमी, नितीमान, रणधुरंदर अशा छत्रपती संभाजीराजांची १४ मे रोजी जयंती आहे. त्यानिमिताने हा लेख प्रपंच. वयाच्या १४ व्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून संस्कृत पंडित असणारे, त्यानंतर नखशीख, सातसतक, नायिकाभेद हे ग्रंथ ब्रज भाषेत लिहून लेखनाची मक्तेदारी मोडीत काढणारे, गागाभट्ट यासारख्या संस्कृत पंडितानी ‘समनयन’ या नावाचा ग्रंथ लिहून संभाजीराजेंना अर्पण केला. संभाजीराजांचा उल्लेख त्यांनी ज्याच्या तलवारीच्या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत असा केला मराठा साम्राज्याच्या 15 पट सैन्य असणाऱ्या मुघल साम्राज्याशी एक हाती लढणारे, १६ भाषा अवगत असणारे, आयुष्यातील सर्वच्या सर्व युद्धे जिंकणारे अजिंक्य योद्धे संभाजीराजेच. संभाजीराजेंना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.
विकृत इतिहासकार, नाटककार, कादंबरीकार आणि चित्रपटवाल्यांनी त्यांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सर्व आरोपांच्या भट्टीतून तावून सुलाखून संभाजीराजांचे चरित्र तितक्याच तेजाने तळपत आज समोर आले आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीतून त्यांचें निष्कलंक चारित्र्य सिद्ध झाले आहे. त्यांच्यावरील आरोप आणि त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मांडणीचा प्रसार सर्वसामान्य शिवशंभू प्रेमींपर्यंत व्हायला हवा.
महापराक्रमी, विद्वान, रसिक, राजनीतिज्ञ, धर्मपंडित यांबरोबर रणांगणावर कमालीचे शौर्य गाजवणाऱ्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना काहींनी आरोपीच्या कठड्यात उभे केले. काही बखरकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कादंबरीकार यांनी त्यांची उपेक्षाच नव्हे तर सतत अवहेलना केली. खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व परिस्थितीवर राजेंनी आपल्या कृतीतून बोलण्यातून वागण्यातून मात केली.
चारित्र्यहनन:-
संभाजी राजें सारख्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाला बदनाम करण्यासाठी त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. वास्तविक ज्या बखरीला इतिहास म्हणता येत नाही, अशी मल्हार रामराव चिटणीस बखर राजांच्या बदनामीस कारणीभूत ठरली. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी उत्तर पेशवाईच्या काळात रचलेल्या या बखरीत शंभूराजांना जितके बदनाम करता येईल तितके करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. चिटणीसाचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीसला संभाजीराजांनी राजद्रोहाची शिक्षा म्हणून हत्तीच्या पायाखाली दिले होते. याचा राग धरून संपूर्ण बखरीत राजांविषयी द्वेष ठासून भरलेला दिसतो. दिलेरखानाला संभाजीराजे जाऊन मिळणे ही शिवरायांचीच खेळी होती, मात्र काही अर्धवटराव यावरही आक्षेप नोंदवतात.
स्त्रियांची काही काल्पनिक पात्र उभे करणे:-
जिजाऊ शिवरायांचे संस्कार असणारे संभाजीराजे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्त्रियांना सन्मानाने वागवले. मात्र चिटणीस बखरी चा आधार घेऊन काही स्त्रियांशी त्यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते.
- गोदावरी:-
गोदावरी ही कोणतेही अस्तित्वात नसणारे पात्र. अण्णाजी दत्तो यांची कन्या म्हणून ती काल्पनिकरित्या उभी केली. अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगीच नव्हती. गोदावरीची समाधी रायगडाच्या पायथ्याला दाखविण्यात आली, मात्र ती समाधी गोदावरीची नसून माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची आहे. अस्तित्वात नसणारे गोदावर याची समाधी दाखवून राजे यांची बदनामी करण्यात आली. अस्तित्वात नसणारे पात्र रंगवून संभाजीराजेंनी जबरदस्ती केल्याने तिने आत्महत्या केली असा आरोप करणाऱ्यांचा शंभूद्वेष पदोपदी जाणवतो.
- थोरातांची कमळा:-
हे नावही राजेंच्या जीवनात व चरित्रात कधीही नव्हते. तसा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. ‘बी’ नावाच्या कवीने कमळा नावाचे काव्य लिहून या तथाकथित ‘कमळे’ स प्रसिद्धी दिली. 1941 सालच्या ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटाने या कमळे चा प्रसार केला. ना. के. सोनसुखार यांचे 1951 मध्ये ‘थोरातांची कमळा’ हे नाटक आले. संभाजीराजांनी केलेल्या जबरदस्तीमुळे थोरातांच्या कमळेने आत्महत्या केली अशी मांडणी काही साहित्य, नाटके, चित्रपटातून मांडली. प्रत्यक्षात मात्र कमळा हे काल्पनिक पात्र मुद्दामहून निर्माण करण्यात आले. पन्हाळ्याच्या पायथ्याशी कमळेची समाधी दाखविली जाते. ती कमळे ची नसून बाळाजी विश्वनाथ भट यांच्या फौजीशी लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात व सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोडाबाई थोरात या दाम्पत्याची आहे. या समाधीवर कमळेच्या निधनाचे साल 1698 दाखवले जाते. मात्र संभाजीराजे यांचे निधन त्याआधी नऊ वर्षे म्हणजेच 1689 मध्ये झालेले होते. संभाजी राजेंच्या बदनामीसाठी कमळा पात्र व थोरातांच्या समाधीचा गैरवापर झालेला आहे.
-
तुळसा:-
तुळसा नावाची कोणतेही पात्र संभाजीराजेंच्या काळात अस्तित्वात नव्हते. दूर दूर पर्यंत या नावाचा संबंध नाही. ऐतिहासिक साधनांत तुळसा हे पात्र शोधूनही सापडत नाही. आत्माराम पाठारे यांनी त्यांच्या ‘संगीत श्री छत्रपती संभाजी’ या नाटकात तुळसा जन्माला घातली. राम गणेश गडकरींनी ‘राजसंन्यास’ नाटकात तुळसा या पात्राला भरभरून प्रसिद्धी दिली. गडकरींनी या नाटकात संभाजी महाराजांच्या तोंडी अश्लील संवाद घातले. वि. वा. हडप यांनी 1923 मध्ये आपल्या ‘राजसंसार’ नाटकात तुळसेला पुन्हा प्रसिद्ध केले. केवळ नाटकाच्या प्रसिद्धीसाठी काल्पनिक तुळसेचा आधार घेऊन संभाजीराजेंची बदनामी केली.
- झेबुन्निसा/झिअतुन्निसा:-
ही औरंगजेबाच्या मुलींची नावे. यांचा आणि संभाजीराजे यांचा कुठलाही संबंध नव्हता. मात्र काहींनी तो जोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा संभाजीराजे शिवरायांबरोबर आग्रा येथे गेले होते, तेव्हा संभाजी राजेंचे वय ९ वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी कधीही या दोन्ही मुलींना पाहिले सुद्धा नाही. झिअतुन्निसा संभाजीराजेंपेक्षा १४ वर्षांनी मोठी तर झेबुन्निसा १९ वर्षांनी मोठी होती. औरंगजेबाने संभाजीराजेंना कैद केले, त्यावेळी या नावांचा संदर्भ देऊन खोटा इतिहास सांगितला जातो. संभाजीराजे यांची बदनामी करण्यासाठी चिटणीस बखरीचा आधार घेतलेला आहे.
- व्यसनी म्हणून दाखवले:-
संभाजीराजेंना कोणतेही व्यसन नव्हते. मात्र काही नाटकांत तर त्यांची इंट्रीच ग्लास घेऊन दाखवली गेली आहे. काफीखान नावाचा अख्बारी औरंगजेबाच्या दरबारात होता. काफीखानने संभाजीराजेंचे वर्णन करताना लिहून ठेवलयं, “तो संभाजी स्वतःच्या बळावर, शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनात…….! जणू संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढलीयं.” याचेच भाषांतर ग्रँट डफने “intoxicated with the wine of fully and pride” असे केले. मात्र आपल्याकडील काही इतिहासकारांनी त्याचा अर्थ दारुड्या असा घेतला. संभाजीराजेंनी पोर्तुगिजांना एक पत्र पाठवलं होतं. गोव्यात पोर्तुगीजांना हरवल्यानंतर केलेल्या तहातील ते पत्र आहे. त्यात दोन पिंप दारू संभाजीराजेंना देण्याचा पोर्तुगीजांनी करार केला होता. ती दोन पिंप दारु ही तोफेची दारु होती. काहींनी त्याचा अन्वयार्थ पिण्याची दारू म्हणून घेतला. या अज्ञानामुळे संभाजीराजेंना व्यसनी ठरवण्यात आले, जे कधीही व्यसनी नव्हते.
- संभाजीराजे आणि सोयराबाई:-
सोयराबाईंना ‘कैकयी’ठरविण्याची काहींची भूमिका होती. त्यातून सोयराबाई यांनी शिवरायांवर विषप्रयोग केला असा आरोप लावण्यात आला. हा राग मनात ठेवून संभाजीराजेंनी सोयराबाई यांना भिंतीत चिणून मारले, असं चिटणीस बखरीचा आधार घेऊन सांगण्यात येते. वास्तविक चिटणीस सांगतो ती घटना झाल्यापासून सोयराबाई दीड वर्ष जिवंत होत्या. ऑगस्ट 1680 मध्ये संभाजीराजे हे सोयराबाई राणीसाहेबां बद्दल ‘स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माता’ असे गौरवोद्गार काढतात, यावरून हे कपोलकल्पित आणि रंगवलेले असल्याचे दिसून येते. संभाजीराजे हे खूप चांगले आणि शुद्ध चारित्र्याचे होते. याचा जबरदस्त पुरावा म्हणजे हंबीरराव मोहिते यांची वागणे. हंबीरराव मोहिते हे सख्ख्या बहिणीची साथ सोडून संभाजीराजेंना साथ देतात. याप्रसंगी संभाजीराजे हंबीररावांना विचारतात, “मामा तुम्ही असे का वागलात ? आपण मातोश्री सोयराबाई यांचे सख्खे भाऊ असूनही त्यांच्या पाठीशी न राहता माझ्या पाठीशी कसे राहिलात ?” त्यावेळी हंबीरराव मोहिते यांनी सांगितले की, “कसेही करून संभाजीराजेस वाचविणे, या सोयराबाईंच्या निरोपा मुळेच मी आपणास वाचवू शकलो “. मात्र हा इतिहास जाणून बुजून वेगळ्या पद्धतीने वारंवार मांडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
- दिलेरखानाला जाऊन मिळणे:-
दिलेरखानाला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनी ही खेळी खेळल्याचे म्हटले जाते. शिवराय दक्षिण दिग्विजय करत असताना औरंजेबाने दिलेरखानला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी 15000 फौज घेऊन चाल करून पाठवले होते. शिवराय बाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजीला तोंड देणे जिकिरीचे काम होते. त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता. शिवराय आणि संभाजीराजे यांनी ठरवून केलेली खेळी म्हणजे संभाजीराजांनी दिलेरखानाकडे पत्रव्यवहार चालू केला. या पत्रव्यवहारासाठी औरंगजेबाची परवानगी लागे. अनेक वेळा पत्रव्यवहार झाल्याने यात अनेक महिन्यांचा काळ निघून गेला. दिलेरखान पत्रव्यवहारातच अडकून बसला. यातच शिवरायांची खेळी यशस्वी झाली. या 11 महिन्याच्या कालखंडामध्ये मोगलांनी स्वराज्यावर कुठेही आक्रमण केले नाही. अपवाद फक्त भुपाल गडाचा. तोही मराठ्यांनी अवघ्या पंधरा दिवसात परत घेतला.
काहींनी जाणीवपूर्वक तर काहींनी अजाणतेपणे संभाजीराजेंवर अन्याय केला आहे. काही इतिहासकारांनी त्यांना बदफैली म्हणून रेखाटले तर काहींनी त्यांना धर्मवीर म्हणून एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले. काहींनी संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले असा काल्पनिक आणि चुकीचा इतिहास रंगवला. पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्रे जगाच्या इतिहासात नेहमीच रचली जातात, मग शंभूराजे तरी त्याला अपवाद कसे ठरणार? समाज जागर त्यामुळे आज सत्य समोर येत आहे. आणि असत्य सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे.
संभाजीराजेंना सोळा भाषा अवगत होत्या. जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल तर बहुभाषिक व्हावे लागते हे संभाजीराजांकडून आजच्या युवकांनी शिकणे गरजेचे आहे.
९ वर्ष…… सलग ९ वर्ष…… इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल अशा एक नाही तर तब्बल बारा बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजीराजा आम्हाला कुणी सांगितलाच नाही.
दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करुन सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा राजा कधी सांगितलंच नाही.
स्वतःच्या पत्नीला ‘स्त्री सखी राज्ञी जयति’ असा किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देत स्त्री-पुरुष समानतेचं मूळ धरून मुलकी कारभार सोपवणारा दृष्टा सुधारक कधी समोर आणलाच नाही.
भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ ठरलेली पंढरपूरची वारी आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी विभूतींच्या पालखी सुरू करून त्यांना सरकारातून खर्च आणि संरक्षण देणारा संस्कृती पुरस्कर्ता लोकांसमोर दिसलाच नाही.
रामशेज सारख्या कमी उंचीच्या पठारी किल्ल्याला सहाशे मावळ्यांच्या जोरावर हजारों गनिमांना सहा वर्षं ताटकळतं ठेवणारे रूप कमी वेळा समोर येते.
समुद्रात ८०० मीटर लांबीचा भराव टाकून पुल बांधणारे इंजिनियर चे रूप गावतचं नाही.
राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडीलधाऱ्यांचा मान आणि इज्जत अबाधित ठेवणारा मानी संस्कारी राजा सुप्त ठेवला जातो.
बाणांच्या वर्षावात मनुष्य हानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जाकीटं तयार करून काळजी घेणारा राजा फार कमी इतिहासकारांना दिसतो.
‘ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा ठेवतो? आणि ‘मराठा म्हणून कोण पाठी घालतो? अशी कणखर भूमिका ठेवणारा दृष्टा व बहुजनवादी राजा म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे होत.
(डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर यांचा शिक्षण, इतिहास, आरक्षण, मराठवाडा आणि शेतीप्रश्नांचा चांगला अभ्यास आहे. ते मराठा-सेवक म्हणून कायम स्वत:ला संबोधतात.)