मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली चौकशी होत आहे. राज्यभर भाजपाने फडणवीसांच्या चौकशीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने राजकीय सूडबुद्धीतून राज्यातील आघाडी सरकार तसे करत असल्याचा आरोप केला आहे. तर आघाडीच्या नेत्यांनी आजवर विरोधकांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करणारे भाजपावाले पोलिसांनी साधी चौकशी करतानाच का चिडत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी
- देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली आहे. मुंबई पोलिसांकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
- या नोटिशीनुसार देवेंद्र फडणवीस यांना १३ मार्च रोजी मुंबईतील बीकेसीमधील सायबर गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहायचे होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले “गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांचा दूरध्वनी मला आता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.” असे ते म्हणाले.
भाजपा नेत्यांचं सरकारवर जोरदार टीकास्त्र
- देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडी सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्यं जपतो.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं की, “घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवता. मग घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी? लक्षात असू द्या,झुकणार नाही!”
आघाडीवर भाजपा नेत्यांचा सूडबुद्धीचा आरोप
- महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत.
- साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. त्यासाठी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन सभागृहात सादर केले.
- हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहे. असा आरोप भाजपाने केला आहे.
भाजपा नेते आता का चिडतात?
- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांना आरोप करण्याची सवय असून त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच राजकीय नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपा केंद्रीय यंत्रणांमार्फत अडकवते आणि आता पोलिसांनी फक्त चौकशीचं म्हटलं, तर का खुपते असा प्रश्न विचारला आहे.