मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशात कोणाची सत्ता येणार हे अधिकृतरपीत्या १० मार्चलाच समजेलच, मात्र एक्झिट पोल्सनी २ पोल्सचा अपवाद वगळता यूपीत योगींचेच सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळीही भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करतानाच २०१७ च्या तुलनेत यावेळी समाजवादी पक्षालाही जास्त जागा मिळण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. या निवडणुकीतील एक्झिट पोल्चे अंदाज कितपत खरे ठरतात ते प्रत्यक्ष निकाल लागल्यावर १० मार्चला कळेल. पण नेहमी घडतं तसंच आता सुरु झालं आहे. एक्झिट पोल्समध्ये ज्यांना कमी जागा दाखवल्या जातात, त्यांच्याकडून एक्झिट पोल्सबद्दल संशय घेणे नेहमीचेच असते. आताही तेच घडत आहे. त्यामुळे यूपीतील गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोल्समध्ये कोणते अंदाज वर्तवण्यात आले होते, त्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न:
उत्तरप्रदेशात २०१२ आणि २०१७ मध्ये एक्झिट पोल्सचे अंदाज आणि वास्तविक निकाल
- २०१२ च्या एक्झिट पोलमध्ये काय झाले?
- २०१२च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकाही खूप गाजल्या होत्या. त्यानंतर सर्व एक्झिट पोलमध्ये बहुजन समाज पक्षाचे
- सरकार जाईल आणि सपा सरकार येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
- स्टार न्यूज नेल्सनने बसपाला ८३ आणि सपाला १८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती.
- सीएनएन-आयबीएनने बसपाला ६५ ते ७० जागा आणि सपाला २३२ ते २५० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती.
- आजतकने बसपाला ८८ ते ९८ आणि सपाला १९५ ते २१० जागा मिळू शकतात असा दावा अंदाज व्यक्त केला होता.
प्रत्यक्षात काय घडलं?
निकाल समोर आल्यावर समाजवादी पक्षाला २२४ जागा मिळाल्या होत्या. बसपाला ८० जागा मिळाल्या. भाजपला ४७ तर काँग्रेस-आरएलडी आघाडीला ३७ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ एक्झिट पोल्सचे अंदाज बऱ्यापैकी योग्य ठरले होते.
२०१७ च्या एक्झिट पोलमध्ये काय झाले?
- टुडे चाणक्य आणि अॅक्सिसने भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे सांगितले होते.
- व्हीएमआर पोलने भाजपाला बहुमताच्या जवळ नेले होते.
- सी व्होटर्स, इंडिया टीव्ही फोरकास्ट, एबीपी न्यूज-सीएसडीएस यांनी भाजपा बहुमतापासून खूप दूर असल्याचे दाखवणारे अंदाज वर्तवले होते.
- अॅक्सिसच्या सर्वेक्षणात भाजपा आघाडीला सर्वाधिक २७९ जागा दाखवल्या होत्या
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या वेळी म्हणजे २०१७ मध्ये सात टप्प्यांमध्येच निवडणुका झाल्या. उत्तरप्रदेशमध्ये ४०३ जागा असून बहुमताचा आकडा २०२ आहे.
प्रत्यक्षात काय घडलं?
- या सर्व एक्झिट पोलपेक्षा भाजपाला कितीतरी जास्त जागा मिळाल्या.
- निकाल आले तेव्हा एकही एक्झिट पोल १०० टक्के योग्य सिद्ध झाला नाही.
- निकालात भाजप आघाडीला ३२५ जागा मिळाल्या.
- एकट्या भाजपाने ३१२ जागा जिंकल्या.
- सपाला ४७, बसपाला १९ आणि काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या.