मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ व टाळू या मोफत शस्त्रक्रिया करण्याकरिता २२ बालकांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पीटल अकोला येथे पाठविण्यात आले. या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहायक अनिता हसबणीस यांनी उपस्थित राहून बालकांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या ३५ बालकांकरिता डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या २६ बालकांपैकी २२ बालकांना आज स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पिटल अकोला कडे स्वतंत्र बसने पाठविण्यात आले. बालक व पालकांचा पूर्ण प्रवास, शिबीरादरम्यानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
या शस्त्रक्रिया स्माईल ट्रेन या सेवाभावी संस्थेमार्फत करण्यात येतात. स्माईल ट्रेन या योजनेकरिता रूग्णांस कोणत्याही प्रकारचे एकही कागदपत्राची आवश्यकता नसल्याने पालकांना सोयीचे होत आहे. अकोला येथील रूग्णालयामध्ये सदर योजनेतून बालकांच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे व पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याने रूग्णांस एक रूपयाही खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सदर प्रकारची २६९ बालके ही शस्त्रक्रियेनंतर सामान्य जीवन जगत असून दुभंगलेल्या ओठांमुळे त्यांचे चेहऱ्याचे होणारे विद्रुपीकरण देखील नाहीसे झाले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८९ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथकांमार्फत करण्यात येत आहे. प्रति २५ हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण ३२ वैद्यकिय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकांमार्फत किरकोळ आजार असणाऱ्या लाभर्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. या तपासणीमधून हृदय रोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात.