मुक्तपीठ टीम
सर्वसमावेशक महिला धोरण तयार करून ते राबवावयाचे आहे. याबाबत विविध घटकांसमवेत बैठका घेण्यात येत असून अभिप्राय मागविण्यात येत आहे. आज विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महिला धोरणाच्या प्रारूप मसुद्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिला धोरणामध्ये अधिक बाबी समाविष्ट करणे आवश्यक वाटते, त्या तात्काळ कळवाव्या. या धोरणाचा प्रारूप मसूदा पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात अभ्यास करण्यात यावा.
आपल्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात विशाखा समिती गठित करण्यासंदर्भात आढावा घ्यावा. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी कृषी विद्यापीठांनी सहकार्य करावे. तसेच महिलांना शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाली पाहिजे. अनेक विद्यापीठात महिलांसाठी कौशल्य विषयक अभ्यासक्रम असतात, त्याची माहिती त्यांना होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ॲड.ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी कृषी विद्यापीठे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई,नागपूर,औरंगाबाद, बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा या विद्यापीठांचे कुलगुरु दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.