मुक्तपीठ टीम
राज्यातील सेवेतील शिक्षकांसाठी तीन वर्षांनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असल्याचे काल दि २२/११/२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सूचना पत्र वितरित केले आहे त्यामुळे राज्यातील कित्येक शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी मिळण्यातील अडचण दूर झाली आहे. राज्यात सुमारे दहा हजार शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ व निवड श्रेणी पासून वंचित राहिले आहेत.
राज्य शासनातर्फे यावेळी प्रथमच या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्वीप्रमाणेच विनाशुल्क देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली असून शासनाने हे प्रशिक्षण विनाशुल्क देण्यात यावे असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये शालार्थ आय डी ची नोंद करणे सक्तीचे असल्यामुळे विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंशासित, शाखेतील शिक्षकांना प्रशिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे शालार्थ आय डी ची सक्ती रद्द करण्यात यावी अशी विनंतीसुध्दा केली असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.