मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारने पैसे जमा करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील BSNL, MTNL या दोन टेलिकॉम कंपन्यांच्या मालमत्ता विकण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांच्या ९७० कोटींच्या मालमत्तांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM)च्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार, ९७० कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. यात मुंबईच्या गोरेगावमधील मालमत्ताही आहे.
कोणत्या मालमत्ता विकणार?
हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे असलेल्या BSNL मालमत्ता सुमारे ६६० कोटी तर MTNL च्या वसारी हिल, गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या मालमत्ता ३१० कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी DIPAM वेबसाइटवर सूचीबद्ध केल्या आहेत.
एक ते दीड महिन्यात विकणार!
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी के पुरवार यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, “एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील मालमत्तेतून पैसा उभा करण्याचा हा पहिला टप्पा आहे. बीएसएनएलच्या ६६० कोटी आणि एमटीएनएलच्या ३१० कोटींच्या मालमत्तेसाठी बोली मागविण्यात आल्या होत्या. आम्ही योजना आखत आहोत. एक ते दीड महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू.”
सरकारी टेलिकॉम कंपन्यांचे पुनरुज्जीवन करणार!
- मालमत्ता विकून पैसा उभा करणे हा MTNL आणि BSNL साठी ६९,००० कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन योजनेचा एक भाग आहे.
- यासाठी सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये मान्यता दिली होती.
- याशिवाय, MTNL मालमत्तेचा ई-लिलाव १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
- ह्यामध्ये MTNL चे २० फ्लॅट्स देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
- या फ्लॅटची किंमत ५२.२६ लाख ते १.५९ कोटी रुपये आहे.
- २०२२ पर्यंत या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेतुन ३७,५०० कोटी रुपयांपर्यंत कमाई करण्याची योजना आहे.
सरकार आणखी सहा सार्वजनिक कंपन्यांमधील हिस्सेदारी सोडणार!
- बीएसएनएल आणि एमटीएनएल रिअल इस्टेट मालमत्तेचा लिलाव करत असल्याने, सरकार या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सहा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील हिस्सा कमी करेल.
- या सहा कंपन्यांच्या नावांमध्ये बीपीसीएल, बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि निलांचल इस्पात यांचा समावेश आहे.
- त्यापैकी बीपीसीएलच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
- बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि निलांचल इस्पात यांचीही बोली प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होऊ शकते.