मुक्तपीठ टीम
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची घटना तसेच नियमांची पायमल्ली सतत होते आहे. २४ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक ही खुली निवडणूक न घेण्याच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. गलगली यांच्या माघारीनंतर आता शरद पवार यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीविरोधात आता रिंगणात आपचे नेते धनंजय शिंदे हेच राहिले आहेत.
अनिल गलगली यांनी का घेतली माघार? सहा हजारांच्या संस्थेत ३४ जणांनाच मताधिकार!
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने जाहीर केलेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत अनिल गलगली यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
- अनिल गलगली यांनी माघार घेताना अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
- ही निवडणूक घटनेच्या नियम १०.१ प्रमाणे खुली निवडणूक व्हायला हवी. प्रत्येक सभासदाला मतदान करून अध्यक्ष/उपाध्यक्ष निवडून देण्याचा हक्क मिळायला हवा असे अनिल गलगली यांचे न्यायोचित स्पष्ट मत आहे.
- यासाठी गलगली यांनी विनंती पत्र लिहून सर्व सभासदांना निवडणूकीबाबत माहिती देण्याची तसेच आवश्यक भासल्यास निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
- परंतु निवडणूक यंत्रणेनं गलगली यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व सहा हजारांपेक्षा अधिक सभासदांऐवजी केवळ ३४ साधारण सभेवर निवडून आलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक घेतली जात आहे.
- निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयाला कोणत्याही नियमाचा आधार नाही आणि निर्णयामुळे गलगली व्यथित झाले आहेत.
निवडणुकीत घटना आणि नियमांची पायमल्ली
लेखी पत्र देऊनही निवडणूक अधिकारी असो किंवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने घटना आणि नियमांची सरळसरळ पायमल्ली केली आहे. या विरोधात अनिल गलगली यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघार घेतल्यानंतर अनिल गलगली यांनी हे ही स्पष्ट केले आहे की अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय फक्त त्यांच्याशी संबंधित नाही. हा प्रश्न समस्त सभासदांच्या हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे योग्य त्या न्यायपीठाकडे दाद मागण्याचा अधिकार राखून ठेवीत आहे.
मुंबई मराठी ग्रंथालयाची साधारण सभेची निवडणूक झाल्यानंतर संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूका निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत घटनेप्रमाणे ६ हजारापेक्षा अधिक मतदार असण्याऐवजी फक्त ३४ मतदार असल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी आक्षेप घेत थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
अनिल गलगली यांनी शरद पवारांचेही वेधले लक्ष
अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्त सहित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक अधिकारी आणि भोईवाडा पोलिसांना पाठविलेल्या लेखी तक्रारीत स्पष्ट केले आहे की मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक संबंधात परिपत्रक दिनांक ०५/१०/२०२१ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निघाले आहे. या परिपत्रकात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणूकीत मतदानाचा अधिकार फक्त साधारण सभेवर निवडून आलेल्या ३४ सभासदांना आहे असे आक्षेपार्ह विधान आहे. या विधानाला कोणताही नियमांचा आधार नाही. संस्थेच्या घटना व नियमावलीत साधारण सभेचे सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतील असे कुठल्याही नियमात नमूद केलेले नाही. उलट घटना व नियमावलीत कलम १० (१) मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून देण्याचा, उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आश्रयदाता, सहायक, उपकर्ता, आजीव, सन्माननीय सभासद या वर्गातील सभासदांना आहे असे स्पष्ट म्हटले आहे.
शरद पवारांच्या पॅनलमध्ये कोण?
दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे , निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत.
शरद पवारांच्या पॅनलविरोधात रिंगणात कोण?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत.
आजवर अर्जही न करता नेमणुका, आपच्या धनंजय शिंदेंमुळे प्रथमच आव्हान!
डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार २०१७ पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच कोणत्या या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त ३४ सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.