मुक्तपीठ टीम
ड्रोनच्या मदतीने औषधांच्या वितरणासाठी शेवटच्या टप्प्यातील चाचणी नुकतीच घेण्यात आली. बंगळुरूच्या बाहेरच्या परिसरात घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी चाचणी ठरली. त्यामुळे आता नेहमीच्या किंवा आणिबाणीच्या आपत्ती परिस्थितीत ड्रोनचा वापर करून औषध पुरवठा करणे शक्य होणार आहे. दुर्गम भागात औषध पुरवठा करणे सोप नसते. त्यामुळे ड्रोन डिलिव्हरीच्या मार्गाने कधीही, कुठेही आणि कसाही औषध पुरवठा आता अशक्य नाही.
नागरी विमान वाहतूकीचे महासंचालक म्हणजेच डीजीसीए यांच्या देखरेखीखाली थ्रोटल एरोस्पेस सिस्टीम्स (टीएएस) आणि उडान यांनी ही चाचणी घेतली. बंगळुरूच्या बाहेरील गौरीबिदानूर येथे १५ किमीच्या परिघात ड्रोनचे दोन प्रकार वापरले आणि त्याची यशस्वी चाचणी केली गेली. २ ते ७ किलोमीटर पर्यंतच्या हवाई अंतरांपेक्षा वेगळ्या निर्दिष्ट क्षेत्रातील विविध अंतरावर २ किलो पेलोडसह बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साईट (बीव्हीएलओएस) ड्रोनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये शिपमेंटचे टेथर्ड लोअरिंग आणि शिपमेंटसह ड्रोनचे लँडिंग समाविष्ट होते.
ड्रोनद्वारे शेवटच्या टप्प्यातील यशस्वीरीत्या चाचणी
- शेवटच्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यामुळे अल्पावधीत ड्रोनच्या सहाय्याने औषधांचे वितरण करणे सोपे होईल.
- हे नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि देशाच्या दुर्गम भागात आपत्तीच्या वेळी मदत करेल.
- जेव्हा रस्त्यातून प्रवास करणे कठीण असेल किंवा कोणत्या समस्या येत असतील तेव्हाही हे उपयोगी ठरेल.
ड्रोनची डिलिव्हरी सिस्टम
- पुरवठा साखळीमध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न हे एक मोठे पाऊल आहे.
- शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे यश वितरण आणि रसद क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवात क्रांती घडवण्याची मोठी संधी आणू शकते.
- किराणा, दुकान मालक, मेडिकल सारख्या छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करण्यात मदत होईल.
- आता या मार्गाने भारताच्या दुर्गम भागात पोहोचता येईल.