मुक्तपीठ टीम
“साईबाबा श्रद्धा आणि सबुरी” मालिकेवरील ‘साईलीला’ स्पर्धेला प्रेक्षकांकडून दररोज मिळणारा भरघोस प्रतिसाद, ‘सप्तपदी’ मालिकेतील अमृता – संजूची अनोखी कथा त्यासोबत संपूर्ण मे महिन्यात दररोज एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रीमियर शोची जबरदस्त मेजवानीमुळे ‘फक्त मराठी वाहिनी’ने प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण केले आहे. या शुक्रवारी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेला अशोक नारकर यांच्या ‘अमृता प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेला विजू माने लिखित – दिग्दर्शित ‘खेळ मांडला’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो सकाळी ११:३० वाजता ‘फक्त मराठी वाहिनी’वर पहायला मिळणार आहे.
“या महिन्यात एकापेक्षा एक सरस – सुपरहिट चित्रपटांचा प्रीमियर ‘फक्त मराठी वाहिनी’वर लॉकडाऊन स्पेशलमध्ये सुरु आहे. सर्व चित्रपटांना तसेच “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी” मालिकेवरील ‘साई लीला’ स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. बाप – लेकीच्या अत्यंत नाजूक, हृदयस्पर्शी नातेबंधाची गुंफण असलेल्या ‘खेळ मांडला’ या चित्रपटाचा प्रीमिअर शो आमच्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे” अशी प्रतिक्रिया ‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी दिली.
“प्रेम आणि वात्सल्य म्हटलं की सगळ्यांना फक्त आईच आठवते. अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपटातून आईची महती गायली गेली आहे. फक्त वडील हा भाग केवळ ओरडणार, मारणारा आणि शिस्तीचे धडे गिरवणारा हताश असलेला, असं चित्र ऊभ केलं गेलंय. त्यापेक्षा वेगळा वडील माझ्या डोक्यात होता, ज्याला वात्सल्याशी तुम्ही कनेक्ट, रीलेट करू शकता. ‘खेळ मांडला’मध्ये वडील आणि मुलीचं जे नातं आहे, त्यातील हळवा भाग दाखविण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तम कथेची जोड मिळाली. या चित्रपटात अभिनय करणाऱ्या सर्व अभिनेत्या मित्रांची मदत मिळाली, निर्माते अशोक नारकरांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यात झाला”, असे लेखक – दिग्दर्शक विजू माने म्हणाले.
‘खेळ मांडला’ चित्रपटात अभिनेता मंगेश देसाईची एका अत्यंत हळव्या पित्याची भूमिका आहे. एक विनोदी अभिनेता ही ओळख या भूमिकेने पुसून तो एक परिपक्व अभिनेता असल्याचे सिद्ध केले. मंगेशला ‘चित्रपदार्पण’, ‘मामी’ व ‘स्क्रीन’ पुरस्काराने गौरवले आहे. चित्रपटाच्या आठवणी सांगताना मंगेश देसाई म्हणाले ‘खेळ मांडला’ या चित्रपटातील भूमिकेसाठी, त्याच्या निर्मितीसाठी मी मनापासून स्वत:ला समर्पित केले होते. या चित्रपटासाठी मी माझ्या आयुष्याची जवळपास दोन वर्षे खर्ची केली आहेत. चित्रपटाच्या या गौरवशाली यशाचे श्रेय माझे निर्माता अशोक नारकर आणि लेखक – दिग्दर्शक विजू माने यांना पूर्णपणे जाते. या दोघांनी माझ्यावर विश्वास दाखविला नसता तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं. माझ्या अभिनय कलेची परख करणारा, प्रतिष्ठा, पुरस्कारांसोबत करियरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला आहे.
कळसूत्री बाहुल्या नाचवणारा दासू आणि त्याची मुलगी ‘बाहुली’यांच्यातील प्रेमाची अनोखी कहाणी ‘खेळ मांडला’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. जन्मापासून अंध-मूकबधिर असलेली बाहुली ही दासूच्या जगण्याचा एकमेव धागा आहे. मंगेश देसाई यांनी दासू ही प्रमुख व्यक्तिरेखा रंगविली आहे तर छोटया बाहुलीच्या भूमिकेत अनन्या देवरे ही बाल कलाकार असून प्रसाद ओक, मानसी साळवी, उदय सबनीस, ऊर्मिला कानिटकर, संतोष जुवेकर आदी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत.
बाप लेकीची अनोखी कथा ‘खेळ मांडला’द्वारे प्रेक्षकांना गुंतवून आणि खिळवून ठेवत एक वेगळी अनुभूती देईल हा विश्वास असल्याने १४ मे रोजी सकाळी ११:३० आवर्जून पहा आपल्या आवडत्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर.