मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट देशात पसरली असून सगळीकडे परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारात आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनच्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील बर्याच राज्यांत ऑक्सिजनची कमतरता असल्याची वाढत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु केली आहे.
ऑक्सिजन एक्सप्रेसला देण्यात येणार ग्रीन कॉरिडोर
या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ साठी एक खास ग्रीन कॉरिडोर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक रोल-ऑन-रेल-ऑफ म्हणजेच रोरो ट्रेन आहे, ज्यावर ट्रक किंवा टँकर वाहतूक केली जाते. रिकामी टँकर मुंबई आणि आसपासच्या कळंबोली आणि बोईसर स्थानकांवरून विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला आणि बोकारो येथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरण्यासाठी जा-ये करतील. ट्रेन सुरू करण्यासाठी सध्या फ्रेट फ्लॅट वॅगनवर टँकर ठेवण्यात आले आहेत. ट्रेन आल्यानंतर हे टँकर रस्त्याने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाठवले जातील.
ट्रेनच्या फ्लॅट वॅगन्सवर ३२टँकर ठेवता येतील. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सरकारांनी यापूर्वी रेल्वेला आपल्या रेल्वे नेटवर्कद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेले जाऊ शकतात का असा सवाल केला होता. दोन राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या हालचालींसाठी तांत्रिक बाबींवर त्वरित विचार करण्यास सुरवात केला. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे यार्ड येथून ऑक्सिजन एक्सप्रेस धावेल.
ऑक्सिजन एक्स्प्रेस मोहिमेअंतर्गत जिथे जिथे मागणी आहे त्या ठिकाणी आम्ही ऑक्सिजन पाठवू असे एका अधिकाऱ्याने सांगितले. १७ एप्रिल रोजी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीसंदर्भात रेल्वे मंडळाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, झोनल रेल्वे केंद्रांना टँकर घेण्याची, लोड करण्याची आणि त्यांना परत पाठविण्याची तयारी दर्शविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प तयार करण्यात आले आहेत. कळंबोलीमध्ये यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या रॅम्पला मजबूत केले जात आहे. मंत्रालयाने सांगितले की, कळंबोली रॅम्प १९ एप्रिलपर्यंत तयार होईल. टँकर इतर ठिकाणी येण्यापूर्वीच रॅम्प तयार होतील.