मुक्तपीठ टीम
अफगाणिस्तानच्या भूमीवरील तालिबानविरुद्धचे अमेरिकेचे गेले २० वर्ष सुरु असलेले थेट युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेने तेथून आपले सैन्य मायदेशी बोलवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने सैनिक हटवल्यानंतर पाकिस्तान समर्थित तालिबानी पुन्हा वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सरकार आणि भारतासाठी अमेरिकेचा निर्णय अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या जिव्हारी लागलेल्या ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००१ मध्ये अमेरिकेने आपले सैन्य तालिबानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठविले होते. तेव्हापासून ते अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानात तैनात असलेल्या २५०० अमेरिकन सैन्याला परतीचा आदेश दिला आहे.
अफगाणिस्तानात ७ हजाराहून अधिक अमेरिकन सैनिक
- सध्या अफगाणिस्तानात ७ हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत.
- त्यातील बहुतेक जण नाटोचा भाग म्हणून तेथे आहेत.
- तालिबानने सातत्याने अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केले आहे.
- गेले काही दिवस तालिबानने पुन्हा एकदा अफगाणी सैन्यावरही हल्ले वाढवले आहेत.
अमेरिकेनेही तयार केला होता हा प्रस्ताव
- यापूर्वी अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानातून परतण्यासाठी १ मे ची मुदत ठरवली होती.
- अमेरिकेला तालिबानशी शांतता करार हवा होता.
- त्यासाठी अमेरिका तालिबानचा सहभाग असणारी नवी सरकारी यंत्रणा तयार करण्याच्या प्रयत्नात होती.
- मात्र अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी तशा सत्ता सहभागास स्पष्ट नकार दिला.
जगातील महागडे लांबलेले युद्ध
- अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात लढलेले युद्ध हे जगातील लांबलेले आणि महागडे युद्ध मानले जाते.
- २० वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिकेने २४०० सैनिकांना गमावले.
- अमेरिकेने परकीय भूमीवरील या युद्धासाठी १५० लाख कोटी रुपयांचा खर्च केला.
- या युद्धाद्वारे अमेरिकेला तालिबानला संपवायचे होते, पण ते आजवर शक्य झाले नाही.
- आताही अनेक अमेरिकन लोकप्रतिनिधींचा अफगाणिस्तानातून सैन्य माघारीस विरोध आहे. तरीही जो बायडन यांनी आग्रहपूर्वक सैन्य माघारीचा निर्णय घेतला आहे.
भारतासाठी अडचणीचा निर्णय
- अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याच्या तैनातीमुळे तालिबानवर वचक आहे.
- अमेरिकेच्या माघारीनंतर पाकिस्तान तालिबानची मदत वाढवेल.
- भारत अफगाणिस्तानमध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम करत आहे.
- त्या प्रकल्पांच्या कामांमध्ये तालिबान अडचणी आणत असतात, आता तसे हल्ले, कुरापती वाढतील.
- तालिबान शक्तिशाली होणे भारताला काश्मिरातील परिस्थितीसाठीही चांगले नाही.