मुक्तपीठ टीम
शेतीसाठी योग्य नसलेल्या आणि कोरडवाहू जमिनीच्या मातीतून केरळच्या किनारी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा ताजा आणि चवदार भाजीपाला उत्पादित करतात. त्यांनी आता छोट्या कांद्यांच्या सेंद्रिय शेतीची वाट निवडलीय.
अनेक युवा शेतकर्यांनी नोकरी सोडली आहे आणि शेतीकडे नवे पाऊल उचलले आहे. त्यांनी कांद्याची सेंद्रिय लागवड करून अशक्य ते शक्य केले आहे. अरबी समुद्राजवळ वसलेल्या या परिसरात शेतकरी पहिल्यांदाच कांद्याची लागवड करीत आहेत. यापूर्वी तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये छोट्या कांद्याची लागवड होते. आता मात्र प्रयत्नांच्या बळावर केरळातही कांदा लागवड यशस्वी झाली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संपूर्ण राज्यात कांद्याची शेती व्हावी यासाठी सुजित नावाचा एक शेतकरी प्रयत्न करत आहे. तो राज्यातील विविध भागातील किमान १०० इच्छुक शेतकऱ्यांना लागवड करण्यासाठी अर्धा किलो कांदा पैसे न आकारता देत आहे.
समाजमाध्यमांवरील माहितीनुसार, सुजितचा जन्म जन्म कांजिकुझी येथे झाला असला तरी हॉटेल मॅनेजमेंट व्यवस्थापनात पदवी मिळवल्यानंतर त्याने प्रथम कार्यालयीन नोकरी व इतर व्यवसाय केला. त्याने २०१४ मध्ये शेती करण्याचे ठरविले. सुरुवातीला त्याच्या मनात असंख्य शंका होत्या की तो यशस्वी होईल की नाही. परंतु, त्याच्या पहिल्या लागवडीचे उत्तम पीक पाहून त्याने ठरवले की आव्हानांना सामोर जायचे. स्वप्ने नक्कीच पूर्ण करायची. केरळ राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट तरुण सेंद्रिय शेतकर्याचा पुरस्कार त्याने मिळविला आहे. आता तो विविध भागात सेंद्रिय शेती करीत आहे. सेंद्रिय शेती केल्याने त्याला दरमहा किमान ५० हजार रुपये मिळतात. नव्या आव्हानांच्या आवडीमुळेच छोटा कांदा लागवड त्याने सुरु केली आणि यशस्वीही केली.
या भागातील जमिनीत छोट्या कांद्याची लागवड आव्हानात्मक होती. पण प्रामाणिक परिश्रमांच्या बळावर कुटुंब आणि मित्रांच्या साथीने तो यशस्वी झाला. अर्ध्या एकरात त्याने ३० किलो कांद्याचे बियाणे पेरले तेव्हा ५०० किलो कांदा मिळाला. तो कांदा त्याच्या पातीसकट विकतो. एका किलोची किंमत ६० रुपये आहे. बियाणे पेरल्यानंतर कांद्याची कापणी ५५ ते ७० दिवसांत करता येते. त्यामुळे कांद्याची लागवड खूप फायदेशीर असल्याचा प्रचार तो सध्या करतो.
पाहा व्हिडीओ: