मुक्तपीठ टीम
तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर करत आज विद्यार्थी नवनवीन शोध लावत आहे. त्यांचा कल तंत्रज्ञानाप्रती वाढताना दिसत आहे. असाच एक विद्यार्थी आहे ज्याने नागरिकांची सुरक्षितता पाहता एक डिव्हाईस बनवले आहे. शिवांश विक्रम या विद्यार्थ्याने कैलाश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड मॅनेजमेंट, गीडा गोरखपूरमधून बीटेक पूर्ण केले आहे, त्यांने एक असे उपकरण डिझाइन केले आहे जे रस्त्यावर अपघात झाल्यास दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला सावध करेल. त्याच बरोबर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जीपीएसद्वारे लाईव्ह लोकेशनचा एसएमएस लिंक त्वरित पाठवेल.
इतकंच नाही तर जिथे अपघात होईल त्याजागी मोठ्याने सायरन वाजेल. जसं की, अपघातानंतर विमानात बसवलेल्या ब्लॅक बॉक्सवरून सर्व माहिती मिळते, त्याचप्रमाणे हे डिव्हाइस म्हणजेच दुचाकी आणि हेल्मेटमधील उपकरणाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अचूक माहिती देईल, असे शिवांशने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
शिवांश आता त्याच्या संशोधन प्रकल्पाचे पेटंट घेण्याची तयारी करत आहे
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी लखनऊनेही शिवांशच्या संशोधन प्रकल्पाला मान्यता दिली.
- १८ जून रोजी झालेल्या अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या उत्तर प्रदेश स्टार्टअप एक्स्पोमध्येही त्याची निवड झाली.
- जिओसह अनेक खासगी कंपन्यांनी या प्रकल्पाचे वर्णन केले आणि गुंतवणूक करण्याची ऑफर दिली.
- उत्तर प्रदेश, दाउदपुर येथील रहिवासी असलेल्या शिवांशने यावर्षी संगणक विज्ञान आणि इंजिनीअरिंगमधून बी.टेक. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हे उपकरण तयार झाल्याचे ते सांगतात.
- त्याला मोटरसायकल ऑटोमेशन सेफ्टी सिस्टम असे नाव देण्यात आले आहे.
- या शोधात आलोक श्रीवास्तव यांनी मदत केली आहे. हे उपकरण तयार करण्यासाठी ६०० ते ७०० रुपये लागतात.
- याशिवाय बाईकच्या इंजिनभोवती कॅमेराही बसवण्यात येणार आहे, जेणेकरून अपघातादरम्यानची छायाचित्रेही काढता येतील.
“२०१९ मध्ये बसने लखनौला जात असताना अपघात झाला. दुचाकीस्वार एक पुरुष व एक महिला पडून जखमी झाले होते, रस्त्यावर रक्ताचे थारोळे पडले होते. मी बसमधूनच पोलीस नियंत्रणाला कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याऐवजी मला वारंवार फोन करून अपघाताचे खरे ठिकाण, गाव आदी विचारत होते. जखमी वाचलेले नव्हते की नाही माहित नाही, या घटनेमुळे मला रात्रभर झोप नाही लागली आणि यामुळे मला असे उपकरण बनवण्याची प्रेरणा मिळाली.” असे शिवांश म्हणाला.
डिव्हाइसचे आधुनिक फिचर्स… अनेकांचे जीव वाचणार!
- या उपकरणात दोन चिप्स आहेत. एक हेल्मेटमध्ये आणि दुसरी इंजिनमध्ये बसवलेली आहे.
- हेल्मेटमध्ये एक छोटी बॅटरी देखील आहे, जी सहा ते आठ तासांचा बॅकअप देते.
- या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत दुचाकीचालक हेल्मेट घालत नाही तोपर्यंत दुचाकी सुरू होणार नाही.
- हेल्मेट घातल्याबरोबर २० सेकंदांसाठी बीप वाजेल. हेल्मेटमध्ये एक बटण आहे, जे दाबल्यावर आवाज बंद होईल. वर्षभरात हे उपकरण बाजारात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे शिवांश सांगतात.
- पेटंट मिळताच त्यावर काम सुरू होईल. हे उपकरण खूप मदत करेल.
- जखमींना वेळेवर उपचार मिळेल. अनेकांचे जीव वाचेल.
- बाईकच्या इंजिनजवळ कॅमेरा बसवण्याचीही तयारी सुरू आहे, जेणेकरून अपघाताच्या वेळी आजूबाजूचा फोटोही काढता येईल.
डिव्हाइस पाच मोबाईल नंबर सेव्ह करता येणार
डिव्हाइसमध्ये पाच मोबाइल नंबर सेव्ह केले जातील. हे नंबर कुटुंबातील सदस्यांचा असतील. अपघात झाल्यास अलर्ट मेसेज आणि लाईव्ह लोकेशन लिंक या मोबाईल नंबरवर एकाच वेळी जाईल.
या तंत्रज्ञानाअंतर्गत इंजिन सुरू होताच दोन्ही चिप्स रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे जोडल्या जातील. तीव्र आघात झाल्यास हेल्मेटमधील चिप प्रथम इंजिन बंद करेल. हेल्मेटला जीपीएस यंत्र बसवण्यात आले आहे, ज्यावरून ते मोबाईल क्रमांकावर लोकेशन पाठवेल. जोपर्यंत बॅटरी कार्यरत आहे तोपर्यंत बाईकमधील सायरन वाजत राहील. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही अपघाताची माहिती मिळणार आहे.