मुक्तपीठ टीम
सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्या संबंधांमध्ये संध्या प्रचंड तणाव आहे. हा असह्य असा तणाव कधीही युद्धात बदलू शकतो. रशिया युक्रेनवर कधीही हल्ल्याचे आदेश देऊ शकते असा दावा अमेरिकेने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या काही दिवसांत त्यांच्या सैन्याला युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश देतील. रशिया युक्रेनचा डोनबास प्रदेश हिसकावण्याचा धोका आहे, असे त्यांचे मत आहे. रशियाने मात्र अमेरिकेचे दावे फेटाळले आहेत. मात्र, युक्रेनने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोचे सदस्य होण्यास विरोध केला आहे.
रशियाचे युक्रेन सीमेवर सैन्य सज्ज!
सलिवान यांनी फॉक्स न्यूजवरील रविवारच्या कार्यक्रमात रशिया-युक्रेन तणावावर बोलताना सांगितले की, रशियाला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश देण्यासाठी काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात. त्याचबरोबर हे युद्ध टाळण्याचा पर्यायही रशियाकडे आहे. हे टाळण्यासाठी ते मुत्सद्दीगिरीतून मार्ग शोधू शकतात. यापूर्वी, अमेरिकेने म्हटले होते की, युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाला आवश्यक असलेले सुमारे ७० टक्के सैन्य तयार आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार रशियाचे सुमारे एक लाख सैनिक आधीच युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत. त्यांच्याकडे मोठी संहारक शस्त्रे आहेत, यावरूनच रशियाचा युक्रेनवर जोरदार हल्ला करण्याचा विचार आहे.
रशियाने फेटाळले अमेरिकेचे दावे, युक्रेनने नाटोसोबत जाण्यास मात्र विरोध!
मात्र, रशियाने अमेरिकेच्या दाव्याला फेटाळून आपला असा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी युक्रेनने नाटो संघटनेसोबत जाण्याची चूक करू नये, असेही रशियाचे म्हणणे आहे.या संघटनेचे युरोप आणि अमेरिकेसह एकूण ३० सदस्य आहेत.रशियाचे म्हणणे आहे की नाटो रशियाच्या सीमेजवळ पाश्चात्य शस्त्रे तैनात करणार नाही. रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्याशीही फोनवर चर्चा केली आहे.मॅक्रो सोमवारपासून रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
समजून घ्या रशिया यु्क्रेन तणावाची कारणं…
- युक्रेनची सीमा पश्चिमेला युरोप आणि पूर्वेला रशियाला लागून आहे.
- युक्रेन हे १९९१ पर्यंत सोव्हिएत युनियनचा सदस्य होतं.
- मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये २०१३पासून तणावाला सुरूवात झाली.
- नोव्हेंबर २०१३ मध्ये युक्रेनची राजधानी कीवमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली.
- यानुकोविच यांना रशियाचा पाठिंबा होता तर अमेरिका आणि ब्रिटनकडून आंदोलकांना पाठिंबा दिला जात होता.
- फेब्रुवारी २०१४ मध्ये यानुकोविच यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली.
- यामुळे संतप्त होऊन रशियानं दक्षिण युक्रेनमधील क्रिमियावर ताबा मिळवला.
- क्रिमियातील फुटीरतावाद्यांनाही पाठिंबा दिला.
- फुटीरतावाद्यांनी पूर्व युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे.
- तेव्हापासून रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनच्या सैन्यात संघर्ष सुरू आहे.
- दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाश्चात्य देश पुढे आले.
- २०१५ मध्ये फ्रान्स आणि जर्मनीनं बेलारूसची राजधानी मिन्स्क इथं रशिया-युक्रेन शांतता करारावरही स्वाक्षरी केली.
- यामध्ये युद्धविराम मान्य करण्यात आला.