मुक्तपीठ टीम
एनआयएने अंबानी स्फोटके प्रकरणात एनकाउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली. प्रदीप शर्मा निलंबित एपीआय सचिन वाझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्या संपर्कात होते का, हे एनआयएला जाणून घ्यायचे आहे. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे शर्माचेदेखील जवळचे आहेत.
सचिन वाझे हे प्रदिप शर्मांच्या नेतृत्वाखालील क्राइम इंटलिजन्स युनिटच्या अंधेरीतील युनिटमध्ये कार्यरत होते. तेव्हा ते उपनिरीक्षक होते. दोघांमध्ये आणखी एक समान धागा तो शिवसेनेचा. वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण पुढे शिवसेनेने कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारीची त्यांची इच्छा पूर्ण नाही केली तेव्हा ते हळूहळू बाजूला गेले. याउलट प्रदीप शर्मा यांनी आधी अंधेरी मतदारसंघातून तयारी केली. पण तेथे शिवसेनेचे मजबूत उमेदवार असल्याने डाळ शिजली नाही. त्यामुळे शर्मा यांनी ठाकूरांचा गड असणाऱ्या नालासोपारा मतदारसंघाचा पर्याय निवडला. तेथे ते पराभूत झाले आणि शिवसेनेतूनही काहीसे वेगळे होत पुन्हा पी.एस.फाऊंडेशनचे काम करु लागले.
अंबानी स्फोटके प्रकरणाच्या चौकशीत प्रदीप शर्मांना बोलवले गेल्याची काही कारणे असल्याचे सांगितले जाते. ती कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
१. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची कथित भेट
मनसुख हत्येच्या काही दिवस आधी वाझे अंधेरी परिसरातील एका व्यक्तीला भेटले. प्रदीप शर्माही त्याच भागात राहतात. ज्या नंबरवरून मनसुखला कॉल केला आणि कॉल केला जात होता त्याचे शेवटचे लोकेशन अंधेरीमधील जेबी नगर होते.
२. शर्मांकडून मिळू शकते वाझेंबद्दल माहिती
एवढ्या दिवसांच्या तपासात एनआयएने बरीच माहिती मिळवली आहे. पुरावेही गोळा केले आहेत. तरीही वाझे स्वत:च पोलीस अधिकारी असल्याने एनआयएला धोका पत्करायचा नसावा. त्यामुळे शर्मांकडून वाझेंबद्दल आणखी माहिती आणि असलाच तर त्यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करायचा असावा.
३. विनायक शिंदेंबदद्ल शर्मांकडे चौकशी
या प्रकरणातील एक आरोपी विनायक शिंदेही शर्मांच्या सीआययू टीममध्ये होते. शर्मा आणि शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमवर छोटा राजनचा गुर्गे लखन भैया याच्या बनावट एनकाउंटरचा आरोप होता. मुंबई बिल्डर जनार्दन भांडे यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर लखन याचा एनकाउंटर झाल्याचा आरोप करण्यात आला. शर्मा यांनाही निलंबित करण्यात आले होते पण नंतर कोर्टामधून निर्दोष सोडले. या प्रकरणात विनायक यांना अटक करण्यात आली होती. ते पॅरोलवर बाहेर आले आणि याच काळात मनसुख प्रकरण बाहेर आले.
तपास अखेर सीमएमओपर्यंत पोहचणार – किरीट सोमय्या
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रदीप शर्मांवर टीका करताना सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या यांनी मांडलेले मुद्दे:
- आधी शिवसेनेचे प्रवक्ता सचिन वाजे जेलमध्ये, आता शिवसेनेचे २०१९ विधानसभेचे उमेदवार प्रदीप शर्मा एनआयएमध्ये.
- हा जो तपास आहे तो आयपीएस ऑफिसर नंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि शेवटी मुख्यमंत्री कार्यालयाच्या दारापर्यंत पोहोचणार याची मला खात्री आहे.
- दोन हजार कोटींची वाझे वसुली गॅंग गुन्हेगारांचा वसुलीसाठी कसा उपयोग करावा, हे उद्धव ठाकरे सरकारने दाखवून दिलं.