मुक्तपीठ टीम
कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतरही ग्रासणाऱ्या म्युकरमायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा कहर वाढतच चालला आहे. काळ्या बुरशीसाठी आरोग्यमंत्र्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्व प्रामुख्याने स्टेरॉइड आणि मधुमेहाकडे बोट दाखवत आहेत. त्यात तथ्य आहेच, पण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते सांगितली जाणारी कारणे खरी जरी असली तरी त्याच जोडीने काळ्या बुरशीचा प्रकोप आताच का वाढला त्यावर विचार केला जाणे आवश्यक आहे.
त्यासाठी व्हेंटिलेटरसाठी योग्य दर्जाचे अतिशुद्ध डिस्टिल्ड वॉटरऐवजी साधे पाणी वापरण्याचा निष्काळजीपणा आणि अन्य वैद्यकीय निष्काळजीपणाही कारणीभूत असू शकतो, असं मत डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेला मोलाचं सहकार्य करत असलेल्या वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांच्या मते रुग्णांवर कोरोना उपचार करत असताना सध्या स्टेरॉइडचा अतिवापर आणि मधुमेहासारख्या रोगांकडे बोट दाखवले जात आहे. ते खरेही आहे. पण हे रोग, स्टेरॉइडचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर हे काही आजचे नाही. ते नेहमीचे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही ते होते. परंतु आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ते एप्रिल-मे महिन्यातच म्युकरमायकॉसिसची प्रकरणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली, त्यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे.
डॉ. घुले यांच्या मते म्युकरमायकॉसिसचा कहर वाढण्यासाठी पुढील कारणेही जबाबदार असू शकतात.
म्युकरमायकॉसिसच्या उद्रेकामागे ‘ही’ कारणंही असू शकतात…
- कोरोना उपचार करतानाचा वैद्यकीय निष्काळजीपणा
- व्हेंटीलेटरसाठी डिस्टिल्ड वॉटर न वापरता साधे पाणी वापरणे.
- खरंतर रुग्णांचे दात स्वच्छ करण्यासाठीही साधे पाणी वापरु नये, डिस्टिल्ड वॉटरच वापरावे, असेही सांगितले जाते. पण तसे होत नाही.
- साधे पाणी हे डोळ्यांनी स्वच्छ दिसत असले तरी अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते दुषित असू शकते.
- बॉटल्ड वॉटरलाही वापरणे, योग्य नाही. काही लोकल ब्रँड्समध्येही शुद्धतेची खात्री देता येत नाही.
- योग्य दर्जाच्या सिरिंज, वैद्यकीय साहित्य नसणे.
- उपचार करणाऱ्यांमध्येच संसर्ग असण्याची शक्यता, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्याही नियमित तपासण्या आवश्यक आहेत.
याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील काहींनी एफडीएकडे बोट दाखवले. सध्या कोरोना उपचारासाठी वैद्यकीय साधने, साहित्य, औषधे याची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, ते बनवणाऱ्यांच्या उत्पादन प्रक्रियेत तेवढ्या काटेकोरपणे शुद्धता राखण्याची काळजी घेतली जाते का, ते तपासणे एफडीएचे काम आहे. ते केले जातेच असे नाही. किमान रँडम सॅंपलिंग करून तपासणी आवश्यक असते, तेही होत नाही. रुग्णालयांची तपासणीही केवळ दाखवण्यापुरतीच होते. त्यामुळे आधीच कोरोनाचा कुकाळ आणि त्यात म्युकरमायकोसिसचा तेरावा महिना असे होत असल्याची खंत वैद्यकीय व्यावसायिक व्यक्त करतात.
म्युकरमायकोसिसची काळी बुरशी कोठे हल्ला करते?
या आजारामध्ये काळी बुरशी नाक, सायनस, डोळा आणि मेंदूमध्ये पसरत त्यांचा नाश ग्रासते, असे दिसून आले आहे.
म्युकरमायकोसिसची लक्षणं
- ताप, डोकेदुखी, खोकला किंवा श्वास लागणे.
- नाक बंद. नाक मध्ये श्लेष्मासह रक्तस्त्राव आहे.
- डोळा दुखणे. डोळा फुगला पाहिजे, एक गोष्ट दृश्यमान आहे किंवा दिसणे थांबवते.
- चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, सूज किंवा नाण्यासारखा त्रास आहे.
- दातदुखी, दात हलणे सुरू होते, चघळताना दातदुखी.
- उलट्या किंवा खोकला असताना श्लेष्मामध्ये रक्त.
लक्षण आढळली तर काय करायचं?
- जर आपल्याला म्युकरमायकोसिसची कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब शासकीय रुग्णालय किंवा इतर कोणतेही विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- लवकरात लवकर उपचार सुरु करा.