मुक्तपीठ टीम
सध्या सर्वत्र रसायनमुक्त अन्नाबद्दल वाढतं आकर्षण आहे. रासायनिक खते, फवारणीचा वापर न केलेल्या सेंद्रीय शेतीतील अन्नधान्य, भाजीपाला महागातही घेण्याची अनेकांची तयारी असते. ही जागरुकता आणखी वाढवण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझमने गोव्यात सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात मुंबईसह देशातील चार प्रमुख महानगरांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
केंद्रीय पर्यटन आणि नौवहन, जलमार्ग आणि बंदर खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज नैसर्गिक खाद्यान्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझमच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन सचिव रवी धवन, भारत पर्यटन पश्चिम विभागाचे संचालक व्यंकटेनशन, हॉटेल व्यवस्थापन संस्थेच्या प्राचार्या श्रीमती डोना डिसूझा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
नैसर्गिक खाद्यान्न महोत्सवाचे आयोजन करुन हॉटेल व्यवस्थापन संस्थेने गोव्यातील पारंपरिक पदार्थांची पश्चिम विभागातून आलेल्या हॉटेल व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना तसेच पाहुण्यांना ओळख करुन दिल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी संस्थेचे कौतुक केले. निरोगी आरोग्याची सुरुवात पोषण आहारापासून होते, त्यामुळे आपण सकस आणि सेंद्रीय आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रदुषण कमी करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडत सेंद्रीय पदार्थांना आहारात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी केले.
गोवा जागतिक नकाशावर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे सर्व घटकांनी मिळून गोव्याच्या पारंपरिक पदार्थांना जागतिक पातळीवर पोहचविले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर (घरोघरी) तिरंगा मोहीम राबवत आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हा, असे आवाहन नाईक यांनी याप्रसंगी केले.
गोवा म्हणजे केवळ सी, सन आणि सँड नाही तर गोव्याची पारंपरिक संस्कृती, पदार्थ याकडे आता पर्यटन खाते लक्ष देत असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
भारत पर्यटन विभागाच्या पश्चिम विभागाचे संचालक व्यंकटेशन यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पश्चिम घाटातील सुंदर प्रदेश असलेला गोवा ‘खाद्यपदार्थांची राजधानी’ म्हणून उदयाला येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
एकदिवसीय खाद्यान्न महोत्सवात पर्यटन आणि संलग्न क्षेत्र तसेच पोषण आहारविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले.
गांधीनगर, भोपाळ, मुंबई आणि बेंगळुरु येथून २५० विद्यार्थी खाद्य महोत्सवासाठी गोव्यात आले आहेत. पारंपरिक पदार्थांना चालना देण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्या श्रीमती डोना डिसूझा म्हणाल्या.