मुक्तपीठ टीम
२०२१ वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्ष २०२२ मध्ये अनेक बदलांचा सामना सामान्यांना करावा लागणार आहे. याचा थेट भुर्दंड सामान्यांना सोसावा लागेल. बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर, एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा यात समावेश आहे. नेमके काय बदल होतील ते जाणून घेऊयात.
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरासंबंधी निय़मांमध्ये बदल
जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर १ जानेवारीपासून डेबिट क्रेडिट कार्डने पेमेंट करतानाची पद्धत बदलणार आहे. ऑनलाईन पेमेंटला आणखीन सुरक्षित बनवण्यासाठी आरबीआयने नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. यानुसार २०२२ पासून ऑनलाईन पेमेंट करतेवेळी तुम्हाला १६ डिजिटच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबरसह कार्डची संपूर्ण माहिती टाकावी लागेल. किंवा टोकनायजेशनच्या पर्यायाचा वापर करावा लागेल. या नियमानुसार, ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटदरम्यान मर्चेंट वेबसाईट किंवा ऍप तुमच्या कार्डची सविस्तर माहिती सेव्ह करुन ठेवू शकत नाही. आरबीआयच्या निर्देशांनुसार व्यापाऱ्यांमार्फत मर्चेंट वेबसाईट किंवा ऍपवर सेव्ह केलेली माहिती हटवली जाईल.
१ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार
१ जानेवारी २०२२ पासून एटीएममधून पैसे काढणं आणखी महागणार आहे. १ जानेवारीपासून देशातल्या सर्व बँकांनी एटीएम चार्ज ५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी महिन्यातून ठराविक वेळा पैसे काढण्याचा नियम मोडल्यास प्रत्येक वेळी २१ रुपये द्यावे लागतील. सोबतच जीएसटीही वेगळा द्यावा लागेल. सद्यस्थितीत ही रक्कम २० रुपये आहे. नवीन वर्षात हीच रक्कम २१ रुपये होईल.
पोस्ट ऑफिससंबंधित नियम बदलणार
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने (IPPB) केलेल्या घोषणेनुसार, शाखेतून निर्धारीत रक्कम जमा किंवा काढण्याची मर्यादा पार केल्यास त्यांना अधिक चार्जेस भरावे लागतील.
- गुगलच्या अनेक ऍपचे नियम बदलणार
- गुगल (Google) पुढच्या महिन्यापासून अनेक बदल करत आहे. १ जानेवारी २०२२ पासून गुगलवरुन ऑनलाईन पेमेंटशी संबंधित नियम बदलणार आहेत. हा नवा नियम गुगलच्या सर्व सर्विसेसशी संबंधित असेल. यात गुगलच्या जाहीराती, यूट्यूब, गुगल प्ले स्टोर आणि इतर सर्विसेसचा समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून जर तुम्ही रुपे, अमेरिकन एक्सप्रेस किंवा डायनर्स कार्डचा वापर कराल तर गुगलकडून तुमच्या कार्डचे डिटेल्स सेव्ह केले जाणार नाहीत.
- एलपीजी सिलेंडरच्या किंमती
- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरचे दर ठरवतात. त्यामुळे १ जानेवारीला कंपन्या सिलेंडरच्या किंमतींबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं असेल.