मुक्तपीठ टीम
आरे जंगलातील मेट्रो कारशेड विरोधात जे बोलतात ते सर्व विकासविरोधी आहेत. आरे जंगल वाचवू पाहणारे सर्वच मेट्रोविरोधी आहेत, असा अपप्रचार सध्या केला जात आहे. अशा अपप्रचाराला थेट उत्तर देत गैरसमज टाळण्यासाठी आरे वाचवा मोहिमेतील तरुण पुढे सरसावले आहेत.
आरे जंगल वाचवणाऱ्यांची कामगिरी आणि त्यांची बदनामी करणाऱ्यांना उघडं पाडण्यासाठी तरुणाईनं संगीतमय जनजागरण सुरु केलं आहे. आरे जंगल वाचवण्यासाठी धडपडणाऱ्यांची विकासविरोधी अशी बदनामी करू पाहणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी मुंबईतील ही तरुणाई पुढे सरसावली आहे.
खरंतर आरेचं जंगल वाचवण्यासाठी ही तरुणाई सतत सक्रिय राहिली आहे. याआधीही जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा ही तरुणाई आरेचं जंगल वाचवण्यासाठी पुढे आली. सर्व त्रास सोसत ती लढली.
मुंबईचं फुफ्फुस मानलं जाणारं आरेचं जंगल. या जंगलात काय नाही? शेकडो वर्षांपासून रुजलेलं हे जंगल नानाविध झाडांनी, वनस्पतींनी समृद्ध असं. २०१९च्या ऑक्टोबरमध्ये एका रात्रीत आरे जंगलातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. मेट्रोने अधिकृत जाहीर केलेली आकडेवारी २ हजार १४१ झाडांच्या कत्तलीची होती. त्याविरोधातही आरेच्या परिसरात मुंबईकरांचा संताप उसळला होता…
खरंतर आरेची झाडे आपलं प्रदूषणापासून संरक्षण करतात. खूप गरजेची आहेत ती. मेट्रो पाहिजेच. पण त्यासाठी गरज नसताना निसर्गाचा बळी देणे अघोरीच. पण तरीही तसं केलं जातंय. तेवढंच नाही तर आरे जंगलातील झाडे वाचवू पाहणारे सर्वच मेट्रोविरोधी आहेत,अशी बदनामी केली जातेय. त्यामुळेच ती बदनामी करणाऱ्यांचं अपप्रचाराचं कारस्थान रोखणं गरजेचं आहे. जंगल वाचवा म्हणजे केवळ मेट्रो कार शेडची जागा बदला. ती कांजुरमार्गच्या पर्यायी जागेत वसवा. मेट्रो पाहिजेच. मुंबईकर म्हणून आम्हालाही वाहतुकीसाठी मेट्रो पाहिजेच पाहिजे. पण ती मेट्रो जंगलाचा बळी घेऊनच धावेल असे नाही. हेच सामान्य मुंबईकरांना पटवून देण्यासाठी ही तरुणाई आपल्या भावना आणि आरे जंगल वाचवण्यासाठीचं वास्तव संगीताच्या मार्गानं पुढे सरसावलीय…
समजून घ्या आरे जंगलाची कहाणी…
• आरेचं जंगल मुंबईचं फुप्फुस!
• आरेचं जंगल हे मुंबईचं फुप्फुस म्हणून ओळखलं जातं.
• १३ हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या आरे वसाहतीत २७ आदिवासी गावे आहेत आणि या जंगलात विविध प्राणी प्रजातींचे वास्तव्य आहे.
• आरेचा हा भाग नाविकास क्षेत्र होतं, पण तो फडणवीस सरकारच्या काळात विकास आराखड्यात कमर्शियल झोनमध्ये बदलण्यात आला.
• त्यानंतर तेथे मेट्रो कारशेडचा प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं.
• त्यासाठी लोकांचा विरोध असतानाही हजारो झाडे तोडण्यात आली.
• सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी कारशेड रद्द केली आणि आरेला जंगलाचा दर्जा दिला.
• आता त्यातही बदल केला जाण्याची चर्चा आहे.
• आरे जंगलातील हजारो झाडांची कत्तल
• मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आरे जंगलात कार शेड योजनेनुसार आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली.
• सप्टेंबर २०१९ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) आणि राज्य सरकारला मेट्रो कार रोडच्या बांधकामासाठी आरे वनक्षेत्रातील कोणतीही झाडे न तोडण्याचे निर्देश दिले ज्यावर MMRCL ला संमती दर्शवावी लागली.
• पण त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो कार शेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनीतील २,७०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाविरुद्धच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.
• देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकारने एका रात्रीत हजारो झाडांची कत्तल केली.
• त्यानंतर प्रचंड जनप्रक्षोभ उसळला.
• सत्तांतरानंतर मेट्रो कारशेडचं स्थलांतर! पण काम लटकले…
• पुढे सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द केला.
• तीच कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्याचा निर्णय घेतला.
• त्यानंतर केंद्र सरकारने त्या जागेवर हक्क सांगत न्यायालयात विरोध केला.
• अद्यापि ते काम तसेच पडून आहे. आता फडणवीसांच्या निर्देशानंतर ते काम सुरु होण्याची शक्यता आहे.
व्हिडीओ सौजन्य :
@saveaarey @ConserveAarey @RajeshVS87 @Laxmantweetsss @radhikachemical @Youthforaarey @ltabhay @letavnilive