मुक्तपीठ टीम
अमराठी भाषकांना भाषिक प्रावीण्य पातळीनुसार आधुनिक आणि प्रमाणित अशा सर्वसमावेशक अभ्यासक्रमाद्वारे मराठी शिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काळानुरुप प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाला मुंबई विद्यापीठाचे मराठीच्या भाषा शिक्षणातील एकमेवाद्वितीय योगदान म्हणता येईल, असा दावा केला जात आहे. माय मराठी १ ते ६ पातळ्यांची दृक्श्राव्य सामग्रीसह १४ पुस्तके, एक अॅप आणि चार विशिष्ट लक्ष्यगटांसाठी चार अभ्यासक्रम (१. परिचारिका, २. रिक्षा आणि टॅक्सी चालक, ३. बँक कर्मचारी आणि ४. सरकारी अधिकारी). ही अध्ययनसामग्री म्हणजे दिग्गज मराठी भाषातज्ज्ञ व जर्मन भाषेच्या नवीनतम अध्यापन पद्धतीचे तज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. HTML दुव्यांवर हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
‘माय मराठी’ प्रकल्प हा मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाचा प्रा. विभा सुराणा यांच्या नेतृत्वाखाली २०१२मध्ये सुरू झालेला एक नाविन्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश अमराठी भाषकांना मराठी शिकवणे हा आहे. पायाभूत व एकमेवाद्वितीय अशा या प्रकल्पांतर्गत भाषाशिक्षणासाठी प्रमाणित युरोपीय चौकटीनुसार अन्यभाषकांसाठी प्राथमिक स्तरापासून ते प्रगत स्तरापर्यंत पद्धतशीर आणि संरचित सामग्रीच्या ६ पातळ्या तयार केल्या गेल्या आहेत. इंग्लिश आणि जर्मनप्रमाणे मराठीदेखील संपन्न आणि पूर्वपरंपरा असणारी इंडो-युरोपीय भाषा आहे. ह्या भाषेचे अध्ययन करून त्यात सर्वसामान्य निजभाषकाइतके प्रभुत्व येण्याकरता किमान ६ पातळ्यांची, म्हणजेच अंदाजे ८०० तासांची आवश्यकता आहे.
मुंबई विद्यापीठाचा जर्मन विभाग गेल्या १० वर्षांपासून मराठी भाषा शिकवण्याचा प्रकल्प (माय मराठी) राबवत आहे. माय मराठी – पातळी १ – पाठ्यपुस्तक आणि अभ्यासपुस्तक – या पुस्तकांचे प्रकाशन १३ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यांनी प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर उदारहस्ते प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची मदत केली.
त्यानंतर कोणताही निधी नसतानाही डॉ. विभा सुराणा यांच्या टीमने प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले. २०१७मध्ये मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाचा राज्य मराठी विकास संस्थेशी करार झाला. संस्थेने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. आणि २०१७पासून राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक मदतीने हा प्रकल्प पुढे चालू राहिला.
प्रकल्पाचे त्रिस्तरीय कार्य : आधुनिक, कृती-आधारित आणि सर्वसमावेशक अशी अध्ययनसामग्री तयार करणे, तिचे अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी त्या सामग्रीचे अध्यापन करणे या तीन स्तरांवर या प्रकल्पाचे कार्य चालते. मुंबई विद्यापीठात या अभ्यासक्रमाचे अध्यापन २०१४ पासून नियमित सुरू आहे आणि आजवर तीन पातळ्यांचे अध्यापन केले गेले आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन माध्यमातून या अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू केले. त्यासाठी आधी इच्छुक आणि पात्र शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
आता प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि आम्ही माय मराठी पुस्तकांच्या २ ते ६ पातळ्यांचे, ४ लघुअभ्यासक्रमांचे आणि माय मराठी अॅपचे प्रकाशन करत आहोत.
भविष्यातील अपेक्षित वाटचाल :
जाहिरात
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे चालवल्या जाणार्या या अभ्यासक्रमांची, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अध्ययनसामग्रीची आणि एकंदर माय मराठी प्रकल्पाची हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांवर जोरदार आणि नियमित जाहिरात व्हावी.
शिखर संस्था
एक शिखर संस्था स्थापन केली जावी.
जी मराठी तज्ज्ञ आणि परकीय भाषा अध्यापन तज्ज्ञ, यांच्या मदतीने तीन कार्ये करेल :
- अन्यभाषकांना आधुनिक पद्धत वापरून मराठी शिकवणे.
- आधुनिक पद्धत वापरून मराठी शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
- नियमित परीक्षा घेऊन मराठी भाषेच्या प्रावीण्य पातळ्यांचे मूल्यमापन आणि प्रमाणीकरण करणे.
- मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी माय मराठी प्रकल्प मोलाचा हातभार लावत आहे.