मुक्तपीठ टीम
मुंबई लोकल १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत कोरोना लसीकरण ऑफलाईन पडताळणी आणि मासिक रेल्वे पास प्रक्रिया सुरु झाली आहे. ही सगळी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण पार पाडल्यानंतर प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
असा मिळवा पास…
- मुंबईतील लोकल प्रवासासाठी मुंबई मनपाने नियमावली जारी केली आहे.
- नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक आहे.
- पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे.
- मुंबई मनपा क्षेत्रात ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष उघडणार आहे.
- संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ स्थानकांवर मदत कक्ष उभारणार आहे.
- सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष कार्यरत राहणार आहेत.
- घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये, तसेच बनावट कोरोना प्रमाणपत्र आढळल्यास कठोर पोलीस कार्यवाही होणार आहे.
ही आहे लोकलची नियमावली
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
- मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकीनजीक ३५८ मदत कक्ष असतील.
- मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
- ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे.
- हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
- रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका (अथवा संबंधित महानगरपालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.
- मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोरोना लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन अॅपवर तपासतील.
- तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रे वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोरोना प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.
- कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.
- जर कोणीही बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तींविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलिस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
- अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.
- या संपूर्ण प्रक्रियेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) देखील नेमले असून त्यांच्यासह आवश्यक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महानगरपालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अखेरीस केले आहे.
रेल्वेपास कोणाला, कसा आणि कुठून मिळणार? जाणून घ्या आवश्यक माहिती…