रोहिणी ठोंबरे
अंधेरीच्या राजाची अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडली. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने आणि कोरोनानंतर दोन वर्षांनी निघणारी येथील मिरवणूक जल्लोषात निघाली असून हजारो गणेश भक्त यात सामील झाले.
कोरोना काळात अनेक निर्बंध होते त्यामुळे गणेशोत्सव दणक्यात साजरा करता आले नाही परंतु, यावर्षी ही सर या उत्साहातून भरून काढलेली आहे. आझादनगर मेट्रो रेल्वे स्थानकपासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला अनेक सेलिब्रेटिंसह गणेश भक्तांनी यंदा मोठी गर्दी केली होती. यावेळी लांबच लांब रांगा आझादनगर परिसरात पसरल्या होत्या. मंगळवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रकवर अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आली. आझाद नगर,अंबोली,अंधेरी मार्केट,एस.व्ही.रोड,जयप्रकाश रोड वरून राजकूमार,अपनाबाजार, चार बंगला, पिकनिक कॉटेज, मछलीमार, गंगाभवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी दुसऱ्या दिवशी ही भव्य मिरवणूक पोहोचली.
बुधवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ च्या सुमारास १८ तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले. जोपर्यंत अंधेरीच्या राजाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत अंधेरीचा गणेशोत्सव संपत नाही. तसेच अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावरच अंधेरीकर संकष्टीचा उपवास सोडतात अशी अंधेरीकरांची दृढ श्रद्धा आहे.
अंधेरीच्या राजाचे संकष्टीदिवशी विसर्जन का केले जाते? काय आहे या मागील मूळ कारण?
१. १९६६ साली अंधेरीच्या आझाद नगर विभागात या राज्याची स्थापना झाली.
२. यावेळी याठिकाणी राहत असलेल्या आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. ३. आमचे कारखाने परत लवकर सुरू होवू दे, आम्ही अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन करू असा नवस या नागरिकांनी अंधेरीच्या राजाला केला होता.
४. त्यावेळी बंद असलेले कारखाने सुरू झाली. त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते.
५. वर्सोवा गावातील मांडवी गल्ली येथील कोळी जमातीचे कार्यकर्ते वर्सोव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे खास बोटीतून विसर्जन करतात.