मुक्तपीठ टीम
मुंबईतील माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे आज रविवारी म्हणजेच ११ सप्टेंबर २०२२ रोजी तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात येणार आहे. ‘प्रकल्प १७ ए’मध्ये बनवण्यात आलेली ही तिसरी युद्धनौका आहे. चालू आर्थिक वर्षात एमडीएलसाठी हा आणखी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
तारागिरी युद्धनौकेच्या निर्मितीची कहाणी…
- ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे.
- यामध्ये विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागाचे (हुल ब्लॉक्स) बांधकाम आणि एमडीएल येथे एकत्रीकरण/बसवणे यांचा समावेश आहे.
- तारागिरीची पायाभरणी १० सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आली होती आणि ऑगस्ट २०२५ पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे.
- या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे.
- युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई) देखरेखीखाली एमडीएल विस्तृत आरेखन आणि बांधणी करत आहे.
कशी आहे तारागिरी युद्धनौका?
- १४९.०२ मीटर लांब आणि १७.८ मीटर रुंद असलेली ही युद्धनौका ,दोन गॅस टर्बाइन्स आणि ०२ मुख्य डिझेल इंजिनांच्या सीओडीओजी संयोजनाद्वारे चालवली जाते.
- त्याचे आरेखन, सुमारे ६६७० टन वजन घेऊन स्थानांतर करताना २८ नॉट्सपेक्षा जास्त वेग प्राप्त करण्याच्या दृष्टीने केलेले आहे.
- प्रकल्प १७ए अंतर्गत युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद हे स्वदेशी विकसित डीएमआर २४९ ए असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने (SAIL) उत्पादित केलेले लो कार्बन मायक्रो अलॉय ग्रेड पोलाद आहे.
- स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील.
या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाणार आहे. शत्रूची विमाने आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली युद्धनौकेची हवाई संरक्षण क्षमता, व्हर्टिकल लॉन्च म्हणजेच हवेत मारा करणाऱ्या आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीवर आधारित आहे.
दोन ३०मिमी रॅपिड फायर गन युद्धनौकेला सर्व बाजूनी संरक्षण क्षमता प्रदान करतील तर एक एसआरजीएम गन युद्धनौकेत नौदलाच्या प्रभावी भडिमाराला पाठबळ देईल. स्वदेशी बनावटीचे ट्रिपल ट्यूब वजनाला हलके पाणतीर लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्स युद्धनौकेच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालतील.
प्रकल्प १७-ए अंतर्गत बांधण्यात आलेल्या या युद्धनौकेसाठी ७५% स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. जी पूर्वीच्या पी-१७ शिवालिक श्रेणीच्या युद्धनौकेत वापरण्यात आलेल्या सामग्रीपेक्षा जास्त आहे.देशातील प्रमुख उद्योजक समूहांकडून तसेच १०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीसह हे जहाज एकीकृत केले जाईल.सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना नव्याने बळ मिळाले ज्यामुळे स्थानिक पातळीवर तसेच संपूर्ण भारतामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच सहायक उद्योगांचा विकास झाला आणि त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत झाली. या जलावतरणाद्वारे आपण स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या क्षमतेच्या निरंतर विकासासाठी आपल्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत. या जहाजाचे आरेखन आणि बांधणी भारतात होत आहे ही वस्तुस्थिती धोरणात्मक स्वायत्ततेच्या आपल्या मागणीनुसार स्वदेशीकरणासाठीची आपली बांधिलकी पूर्ण करते, जी कोणत्याही देशाच्या सामर्थ्यासाठी आवश्यक आहे.
उदयगिरी ही निलगिरी श्रेणीतील दुसरी स्टेल्थ युद्धनौका आणि विशाखापट्टणम श्रेणीतील चौथी क्षेपणास्त्र विनाशिका सुरत या दोन आघाडीच्या युद्धनौकांच्या जलावतरणाने माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या पहिल्या तिमाहीची सुरुवात झाली. या जहाजबांधणी गोदीने एकत्रित जहाजबांधणी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि सुविधांचे आधुनिकीकरण केले आहे आणि विशेष म्हणजे, उत्पादन डेटा व्यवस्थापन (पीडीएम ) / उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन (पीएलएम ), परीक्षणासाठी आभासी प्रत्यक्ष प्रयोगशाळा (व्हीआरएल ) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी यांसारखे उद्योग ४.० चे अनेक तंत्रज्ञान घटक देखील लागू केले आहेत. या व्यवस्थेसह , एमडीएलकडे सध्या एकाच वेळी १० प्रमुख युद्धनौका आणि ११ पाणबुड्या तयार करण्याची एकूण क्षमता आहे.