मुक्तपीठ टीम
वैवाहिक बलात्कार प्रकरणात विवाह म्हणजे पाशवी अत्याचार करण्याचा परवाना नव्हे, असं परखड मत कर्नाटक उच्च न्यायालयानं व्यक्त केले आहे. बलात्काराच्या खटल्यातून विवाहाच्या नावावर अपवाद मागणाऱ्या पतीची याचिका न्यायालयानं फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात पुरुष शिक्षेस पात्र ठरतोच मग तो पती असला तरी दोषीच ठरतो. भारतीय दंड संहिता कलम ३७५ नुसार बलात्काराच्या खटल्यातून विवाहाच्या नावावर अपवाद मागणाऱ्या पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
काय म्हणाले कर्नाटक न्यायालय?
- घटनेत सर्वांना समानतेचा अधिकार असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- अशा स्थितीत पती शासक होऊ शकत नाही, ही जुनी विचारसरणी आणि परंपरा आहे.
- विवाह कोणत्याही प्रकारे स्त्रीला पुरुषाच्या अधीन करत नाही. संविधानात प्रत्येकाला सुरक्षिततेचा समान अधिकार आहे.
- न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक अत्याचारांमुळे पत्नीला मोठ्या मानसिक आघाताला तोंड द्यावे लागते. याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम तिच्यावर होत असतात. पतीच्या अशा गैरवर्तनामुळे पत्नीची आत्मप्रतीष्ठाची खच्ची केली जाते.
- अशा परिस्थितीत वैवाहिक बलात्काराकडेही घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
- अनेक वर्षांच्या मोहिमेनंतरही भारतात वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
विधिमंडळात यावर विचार करावा…
- उच्च न्यायालयाने विधिमंडळाला या मुद्द्यावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
- आम्ही असे नाही म्हणत की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा म्हणून ओळखला जावा किंवा हा अपवाद विधिमंडळाने हटवावा.
- परंतु या मुद्द्यावर विचार करणे आवश्यक आहे.
- कथित गुन्ह्यांच्या कलमातून बलात्काराचा आरोप वगळल्यास तक्रारदार पत्नीला न्याय मिळणार नाही.
वैवाहिक बलात्कार म्हणजे काय?
- वैवाहिक बलात्कार म्हणजे पत्नीच्या संमतीशिवाय पतीने जबरदस्तीने ठेवलेला शारिरीक संबंध.
- वैवाहिक बलात्कार हा कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीवरील लैंगिक अत्याचाराचा एक प्रकार मानला जातो.
- भारतात गेल्या काही वर्षांत वैवाहिक बलात्कारावर कायदा करण्याची मागणी वाढली आहे.
- दिल्ली उच्च न्यायालयात २०१५ पासून या प्रकरणी अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
- परंतु, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की या विषयावर कोणताही कायदा करण्यापूर्वी सर्वसमावेशक विचारमंथन आवश्यक आहे, कारण त्याचा समाजावर खोलवर परिणाम होईल.