मुक्तपीठ टीम
कमी झालेल्या कोरोना संक्रमणाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जर एखाद्या कार्यालयात कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यास त्या भागाचे निर्जंतुकीकरण करून काम पुन्हा सुरू केले जाईल. त्यासाठी, संपूर्ण इमारत बंद किंवा सील करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे, जर एखाद्या कार्यालयात १ किंवा २ संक्रमित रुग्ण आढळल्यास गेल्या ४८ तासात तो रुग्ण ज्या ज्या ठिकाणी गेला असेल त्याच ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार काम पुन्हा सुरू केले जाऊ शकते. जर कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण आढळले तर संपूर्ण ब्लॉक किंवा इमारत निर्जंतुकीकरण करावी.
कंटेनमेंट झोनमधील मार्गदर्शक सूचनांमध्ये काय?
- मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, कंटेनमेंट झोनमधील वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद ठेवली जातील.
- केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कार्यालये उघडण्यास परवानगी आहे.
- शक्य असेल तेव्हा सर्व मीटिंग्स व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या पाहिजेत.
- अधिक लोक एकत्र येण्यास बंदी असेल.
- कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे अधिकारी आणि कर्मचार्यांना त्यांच्या मॅनेजरला त्याविषयीची माहिती द्यावी लागेल.
- कंटेनमेंट झोन संपेपर्यंत त्यांनी कार्यालयात येऊ नये. त्याऐवजी त्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी.
इतर महत्त्वाच्या सूचना
- सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये, यासाठी लिफ्टमधील लोकांची संख्या निश्चित केली जाईल.
- एअर कंडीशनिंग आणि वेंटिलेशनसाठी सीपीडब्ल्यूडीच्या सूचनांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
- एअर कंडिशनरचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सियस पर्यंत असावे.
- कामाच्या ठिकाणी क्रॉस वेंटिलेशनची पुरेशी व्यवस्था असावी.
- कुठल्याही दुकानात, स्टॉलमध्ये, कॅफेटेरियात, कॅन्टीनमध्ये किंवा ऑफिसच्या आवारात कोणत्याही वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजे असणार आहे.
- कर्मचार्यांनी सातत्याने आपल्या शरिराचा तापमान तपासणी करावी.
- जर कोणाला तापासारखी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
- कर्मचाऱ्यांना कार्यलयीन स्थळी मास्क किंवा ग्लोव्ह्जचा वापरणे करणे गरजेचे आहे.
- तसेच बसण्याची व्यवस्था अशी असावी की ज्यात कर्मचार्यांमध्ये किमान ६ फूटचे अंतर असेल.