मुक्तपीठ टीम
गेल्या चार दशकांपासून मानवजातीला त्रस्त करणाऱ्या एचआयव्ही विषाणूंवर मात करणाऱ्या लसीचा शोध लागल्याचा दावा अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्नाने केला आहे. त्यांच्या एचआयव्ही लसीच्या मानवी चाचण्यांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. ४० वर्षांपूर्वी पासूनच्या या आजारावर आजवर कोणताही थेट इलाज शोधण्यात यश आलेलं नाही. आतापर्यंत, या विषाणूवर ३० पेक्षा जास्त लस वापरण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु एकही यशस्वी झालेली नाही. मॉडर्नाच्या लसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या एम-आरएनए तंत्रज्ञानामुळे ती यशस्वी होणे अपेक्षित आहे.
एचआयव्हीवरील लस का महत्वाची?
- एड्सचा आजार गेली चार दशकं मानव जातीला त्रस्त करीत आहे. सुरुवातीच्या वर्षांमधील दहशत आता नसली तरी १००% उपचार नसल्याने भीती आहेच.
- आतापर्यंत, त्याच्या उपचारात वापरल्या गेलेल्या एआरटी उपचारात मोठी प्रगती झाली आहे.
- त्यामुळे एड्सग्रस्त लोक दीर्घकाळ जगू शकतात, परंतु हा आयुष्यभर सुरू ठेवावा लागणारा उपचार आहे.
- डब्ल्यूएचओच्या मते, २०२० मध्ये जगभरात ३७७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली होती.
लस कशी कार्य करेल?
- या लसीला एमआरएनए-१६४४ असे संबोधले जाते.
- हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या बी पेशींना उत्तेजित करण्यासाठी बनवले आहे.
- हे पांढऱ्या रक्तपेशींचे एक प्रकार आहेत.
- जे अॅन्टीबॉडी तयार करतात.
- यामुळे विषाणूचा प्रभाव कमी होतो.
चाचणीसाठी मंजुरी देण्यात आलेल्या लसीचे तंत्रज्ञान कोरोना एका लसी सारखेच!
- एचआयव्हीची ही लस तयार करण्यासाठी एम-आरएनए तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
- कोरोना लस तयार करण्यासाठी मॉडर्नाने देखील याच तंत्राचा वापर केला आहे.
- सप्टेंबरच्या सुरुवातीला मानवी चाचण्या सुरू होऊ शकतात.
- आतापर्यंत एचआयव्ही लस बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत किंवा केले जात आहेत.
- यापैकी अनेक क्लिनिकल चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, परंतु आतापर्यंत कोणतीही लस प्रभावी झालेली नाही.
मानवी चाचणी कशाप्रकारे घेण्यात येणार?
- मॉडर्नाच्या एमआरएनए-१६४४ या लसीची चाचणी ५६ लोकांवर करण्यात येईल.
- हे लोक पूर्णपणे निरोगी असतील, त्यांना एचआयव्ही नसेल.
- लसीची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक प्रतिसादातील बदल चाचणीद्वारे तपासले जातील.
- या लसीच्या विकासासाठी फंडिंग बिल अॅंड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे केला जात आहे.