No Result
View All Result
डॉ. गणेश गोळेकर
मा. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठ्यांना आरक्षण नाकारले. मा. न्यायालयाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी परिस्थिती वाटली नाही. ती का वाटली नाही? त्याला जबाबदार कोण? तत्कालीन सरकार की विद्यमान? केंद्र की राज्य? या वादात अडकण्याची आवश्यकता नाही. एक मात्र सत्य आहे की, मराठा समाजाची बाजू मांडण्यात कुठे तरी आपण कमी पडलो. न्यायालयाला ते पटवून देण्यात उणीवा राहिल्या.
मराठा समाजात काही मूठभर धनदांडगे आहेत. शैक्षिण संस्था, सहकार क्षेत्र, राजकीय क्षेत्रात या लोकांचा दबदबा आहे. मात्र किती लोक आहेत? ४ कोटी मराठा समाजातील असे गावखेड्यात साधारणत: ५ ते १० कुटुंबे निघतील, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. १० ते ३० एकर जमीन आहे. मात्र उर्वरित समाजाचं काय? १०० एकरवरील मराठा अल्पभूधारक केव्हाच झाला आहे. तो आता गुंठ्यावर आला आहे. शेतमजूर केव्हाच बनलेला आहे. त्याच्या दुर्दैवाने अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा त्याला कायमच नडत आहे. त्याने पिकवलेले मातीमोल दराने विकावे लागत आहे. सिस्टीमने त्याच्या पिकवलेल्या मालाचा कधीही विचार केलेला नाही. शेती म्हणजे आतवट्ण्याचा व्यवहार बनलेला आहे. त्याच्या मालाची किंमत त्याला ठरवण्याचा अधिकारच नव्हता आणि नाही.
मराठा समाजात अतिशय विदारक चित्र आहे. सामाजिक रुढी-परंपरांनी त्यांना ग्रासलेले आहे. मुला-मुलींचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात साजरी करीत असल्याने कर्जबाजारी होत आहे. निसर्गाचा लहरीपणा त्याला उत्पन्नालाही साथ देत नाही. पिकलेल्या उत्पन्नाला भाव नसल्याने केलेला खर्चही निघत नाही. सामाजिक कुप्रथा त्याची आजही पाठ सोडत नाहीत. मयताचा दहावा, तेरावा, चौदावा याबाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. सटवाई-मसोबासारख्या ग्रामदेवतेला सामाजिक प्रथा म्हणून बोकडाचा बळी दिला जातो. शेणाच्या दलदलीतून त्याला बाहेर पडताच येत नाही. यात्रा, उत्सव, जत्रा, गावसप्ताह, भंडारा, मंदिराची बांधणी किंवा पुर्नबांधणी यावरही समाजाचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो.
शेती असल्याने त्याला आपला मोर्चा शहराकडे न नेता गावातच थांबवावा लागला. शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसल्याने आपल्या मुलांना तो शिक्षण देऊ शकला नाही. शिक्षणाअभावी वारसाला शेतीशिवाय कोणताच व्यवसाय करता आला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेती असल्याने शेती सोडून शहरात बस्तान बांधण्याचा विचारही त्याला सुचला नाही. मुलीला अर्धवट किंवा शिक्षणच नसल्याने आजची पिढीही अज्ञानाच्या गर्दीत लोटल्या गेल्यात.
नऊवारी साडी, काही भागात त्यावर काष्टा, डोक्यावर मोठेशे कुंकू अशी स्त्री वेशभूषा तर अंगरखा, धोतर किंवा पायजमा, डोक्यावर फेटा किंवा टोपी असा पुरूषी पेहराव मोठ्या प्रमाणात आढळतो. भल्या पहाटे उठून जनावरांचा गोठा झाडून शेणाच्या टोपल्या उचलणं, माय-माऊल्यांना अजूनही चुकलं नाही, घरा-दाराची साफसफाई होताच पाण्यासाठी एक ते दोन कि.मी.ची पायपीट अजूनही चुकत नाही. नऊ ते दहा वाजता न चुकता शेताच्या बांधावर तर जावंच लागतं. ऊन, वारा, पाऊस त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मोठा पाऊस पडला तर कमरेएवढ्या पाण्यातून डोईवर घमेले, कडेवर पोर घेऊन ओढ्यातून यावच लागतं. काळ्या आईवर अंगातून किती घाम पडत असेल याचं मोजमापही न केलेलं बरं. आजारपणात आजही नैसर्गिक उपचार केले जातात. उदा. पोटदुखीसाठी बिबा लावला जातो किंवा रॉकेल वापरलं जातं. बाळंतपण सरकारी दवाखान्यात करावं लागतं. घरात गाडग्या-मडक्याच्या उतरंडी अनेक ठिकाणी आढळतात. ज्यात कुरडया, पापड, शेवया ज्या घरीच तयार केलेल्या आहेत त्या ठेवल्या जातात. अंथरूण-पांघरूण म्हणून घरच्या घरी तयार केलेल्या गोधडी किंवा वानुळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतकरी आत्महत्येत ९८% व्यक्ती हे मराठा समाजाचेच आहेत.
शिक्षणात मराठा समाजाचं प्रमाण अत्यल्प आहे. शिषण नसल्याने आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकामात मदत होते म्हणून मुला-मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावं लागत आहे. नोकरी मिळत नसल्याने शिकून काय करायचं म्हणून शिक्षणात गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नोकरीत मराठा समाजाचा टक्का कमीच आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील गायकवाड आयोगाने शिक्षणातील आणि नोकरीतील प्रमाण चुकीचे ठरवले आहे. ‘मराठा’ जात म्हणून आरक्षणच द्यायचे नसेल तर तरुण भरकटतील, चुकीच्या मार्गाने जातील, ही जबाबदारी भारतीय संविधानाचीच असेल.
(डॉ. गणेश गोळेकर हे मराठा आरक्षणासाठी आग्रही आरक्षण अभ्यासक आणि मराठा सेवक आहेत, संपर्क ८२३७११५३०३)
मराठा आरक्षण आणि अशाच विषयांवर आपले जे मत असेल ते मांडण्याची संधी मुक्तपीठच्या व्हा अभिव्यक्त उपक्रमात आहे. मत कोणतेही असो, फक्त टीका पातळी सोडणारी नसावी. संपर्क 7021148070 muktpeethteam@gmail.com
No Result
View All Result
error: Content is protected !!