दिवाकर शेजवळ
रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये मीडियाचा फोकस हा त्यांच्यातील ‘कवी’ वरच राहतो. अर्थात, त्याला आठवले हे स्वतः आणि गर्दीसमोर त्यांच्या प्रतिभेला येणारा बहरच कारणीभूत ठरतो. ते कोणत्याही सभेला फारसे गंभीरपणे कधीच घेत नाहीत, हे खरेच आहे. पण हल्ली कुठल्या कार्यक्रमात श्रोते तरी नेत्यांची भाषणे कधी गंभीरपणे घेत असतात?
आजकाल ‘ पब्लिक’ही घटकाभरची जरा वेगळी करमणूक म्हणून नेत्यांच्या सभेकडे पाहताना दिसते. त्यांची भाषणे एन्जॉय करण्याचाच लोकांचा मूड असतो. त्यातून नेत्यांचा कलही मनोरंजक भाषणांकडे झुकला तर त्यांना दोष कसा देता येईल?
‘निवडणुका जिंकण्यात आपल्या प्रचार सभांचा वाटा किती असतो?’ असा सवाल भाजपचे श्रेष्ठ वक्ते दिवंगत प्रमोद महाजन यांनी एकदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं यांना विचारला होता. त्यावर त्यांचे उत्तर होते: ‘ हा प्रश्न तर मला राजकारणात अगदी सुरुवातीपासून छळत आला आहे! सभांच्या प्रभावाबद्दल हेच जर खरे वास्तव असेल तर भाषणावेळी ‘धम्माल’ उडवून देणाऱ्या नेत्यांचे काही चुकते, असे म्हणता येणार नाही.
तरीही राजकारणात वावरतांना आपले इप्सित साध्य करण्यासाठी नेत्यांकडे प्रभावी वक्तृत्वापेक्षाही वक्तव्य करताना समयसूचकताच अधिक कामी येत असते. त्यामुळेच सभा जिंकण्यात माहीर असलेल्या नेत्यांतुलनेत वक्तृत्व शैलीचा अभाव असलेल्या नेत्यांचा यशस्वी राजकारण्यांमध्ये भरणा अधिक दिसतो. शरद पवार, कांशीरामजी,रामदास आठवले यांच्यासारखी अनेक उदाहरणे राज्या- राज्यात सापडतील. अशा नेत्यांची वक्तव्ये बारकाईने तपासली तर अचूक लक्ष्यभेद करण्याच्या त्यांच्या समयसूचकतेची प्रचिती घडवतात.
ही समयसूचकता बऱ्याचदा काही एक भूमिका घेऊन आपल्या पक्षाची लोकप्रियता आणि जनाधार वाढवतानाच विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी उपयोगी पडत असते. रामदास आठवले यांनी ‘ उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी माफी मागावी’ अशी मागणी करून भाजप खासदार ब्रजभूषण शर्मा यांच्या सुरात सूर मिळवला आहे. त्यांचे ही मागणी केवळ शर्मा यांचे समर्थन करणारीच नाही. तर, मुंबई- महाराष्ट्राबरोबरच यूपी, बिहारमधील उत्तर भारतीयांना आपला पक्ष त्यांचा पाठीराखा आहे,हा संदेश परिणामकारकरीत्या देणारी आहे, यात शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान करताना केलेले एक मार्मिक वक्तव्य यानिमित्ताने हटकून आठवते. राज्यसभेवरील नियुक्त्यावर बोलताना पवार म्हणाले होते की,’ पूर्वी छत्रपती हे पेशव्यांना नेमायचे. आता उलट झाले आहे. पेशवे छत्रपतींच्या नियुक्त्या करू लागले आहेत!’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संवादी वक्तृत्व शैली तर अफलातूनच होती, हे निर्विवाद आहे. पण वक्तव्यांबाबत समयसूचकते देणही त्यांना लाभली होती. राष्ट्रपतीपदी डॉ अब्दुल कलाम हे असतानाच्या काळात शिवसेना प्रमुखांच्या ठाण्यातील एका निवडणूक प्रचार सभेतील एक किस्सा त्याची साक्ष देतो. बाळासाहेबांनी त्या सभेची सुरुवातच एक सवाल करत केली होती. ‘ आपले राष्ट्रपती हे अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेच्या प्रस्तावावर स्वाक्षरी का करत नाहीत? सही करतांना त्यांचे केस डोळ्यांवर येतात काय? असे त्यांनी जाहीररीत्या विचारले होते!
(दिवाकर शेजवळ हे ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक क्षेत्रातही ते दलित चळवळीतील विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय होते. सध्या ते ‘आंबेडकरी संग्राम’चे नेतृत्व करतात. divakarshejwal1@gmail.com)