डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो !
या लेखाचे शीर्षक हे एका हिंदी चित्रपटातील रोमँटिक गाणे आहे. परंतु आपला विषय मात्र खऱ्या दगाबाजीबद्दलचा आहे. दगा, दगाफटका आणि दगाबाजीची असंख्य उदाहरणे इतिहासात ( व वर्तमानातही ) सापडतात. ती फक्त राजकारणातच असतात असे नाही. उद्योग, सांस्कृतिक व सामाजिक संस्था आणि संघटना, शैक्षणिक व क्रिडा संस्था आणि नातेसंबंधातही दगाबाजी केली वा करवली जाते. साधारणपणे ९०% दगाबाजी ही वाईट उद्देशांसाठी केली जाते. १०% दगाबाजी ही हुशार सज्जन करतात जी वाईटांच्या दगाबाजीचं उत्तर असते. सज्जन हे सज्जन असल्याने त्यांच्या डोक्यात दगाबाजी समजावून घेण्याचा किंवा करण्याचा विचारही येत नाही आणि त्यामुळे ते दगाबाजांकडूनचा त्रास सहन करीत रहातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील पांडव. पांडव हे प्रचंड पराक्रमी होते, परंतु शकुनी, दुर्योधन व धृतराष्ट्राच्या एकत्रित दगाबाजीमुळे वारणावतात मरता मरता वाचले नि नंतर वनवासाला गेले. कौरवांची दगाबाजी ओळखणारा चतुर, चाणाक्ष व सावध कृष्ण शेवटी पांडवांच्या मदतीला आला !
सर्वसाधारणपणे दगाबाजांचे पाच प्रकार होऊ शकतात. पहिला प्रकार हा ‘दगाबाज’ म्हणूनच प्रसिद्ध असणाऱ्यांचा असतो जे बहुतेक राजकारणात व नंतर कार्पोरेट जगतातही बहुसंख्येने आढळतात. राजकारणातील काही सर्वोच्च पदी विराजमान झालेले लोकप्रिय (!) नेते सुद्धा आपल्या ‘करिअर’ दरम्यान केव्हातरी , कुठेतरी दगाबाजी करुनच वर चढलेले असतात. “उद्योग हा युद्धासारखा लढायचा असतो कारण बाजार ही युद्धभूमी असते”, असं एक जगप्रसिद्ध ‘वचन’ आहे. आणि युद्धात तर सारं क्षम्य असतं. यास्तव काही उलट्या काळजाचे उद्योगपती व महत्वाकांक्षी राजकारणी एकत्र आले की दगाबाजीचा महापूर येतो. अशा महापुरात सज्जन उद्योगसमूहांना प्रचंड त्रास होतो आणि प्रजा कफल्लक होत जाते. या संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेतील अस्सल दगाबाज हतबल जनतेलाही माहीत असतात. आता संपूर्ण ‘व्यवस्था’च जर दगाबाजांच्या हातात असेल तर दगाबाजीचे पुरावे मिळणार कोठून ? यास्तव दगाबाजांच्या या व्यवस्थेला दगाबाजीनेच खिंडार पाडावे लागते. यासाठी ‘साम – दाम – दंड – भेद’ही वापरावे लागतात. इथे “साधन – शुचिता” पाळण्याचा प्रयत्न हा जवळपास अशक्य असतो.
दगाबाजांचा दुसरा प्रकार हा खूप घातक असतो कारण तो ओळखता येत नाही. हे लोक वरकरणी अत्यंत सज्जन, शिस्तबद्ध व सेवाभावी दिसतात. यातील काहीजण आपला सुसांस्कृतिकपणा लोकांना पटावा म्हणून मधाळ भाषेत प्राचीन सुभाषितेही हाणत (उच्चारत) असतात. काही जणांची देहबोली ही अतीनम्र असते. याबाबतीतलं एक प्रसिध्द हिंदी सुभाषित आठवतं –
” नमन नमनमें फेर है,
बहुत नमे नादान,
दगाबाज दुगुना नमे,
चित्ता, चोर, कमान.”
म्हणजे ‘दगाबाज’ व्यक्ती ही दोनदोन वेळा, वाकून वाकून नमस्कार करीत असते. यापैकी काहीजण तर “संस्कृती रक्षकां”चा बेमालूम असा अभिनय करीत असतात. अशा लोकांची दगाबाजी ओळखणे व पकडणे खूप अवघड असते. यांच्या अगदी जवळच्या वर्तुळातील लोकांनाच यांचे खरे स्वरूप माहीत असते. हां, यांना ओळखण्याचा पहिला प्रयत्न असतो तो यांचं फसवं तत्त्वज्ञान व तशी फसवी भूतकालीय परंपरा तपासण्याचा. मी तर यांना यांच्या वक्तृत्वावरूनही ओळखू शकतो. यांचं निरीक्षण करताना भारी मजा येते ! यांच्यापैकी बहुतेकांचं डोकं हे दगाबाजीच्या कल्पना निर्माण करतं नि अंमलबजावणी ही “भाडोत्री” माध्यमांद्वारे करून घेतली जाते. म्हणजे हे ‘सात्विक’ दिसणारे दगाबाज ‘सोवळे’च रहातात. मी लहान असताना माझ्या निरागस आई – वडिलांना दगाबाजांनी भरपूर त्रास दिला होता. माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातही अशा सोवळ्या दगाबाजांचा अनुभव मला आल्याने मी सतर्क होत गेलो.
तिसरा प्रकार दगाबाजांचा हा संघटनात्मक किंवा संस्थात्मक असतो. एखाद्या देशाचं संपूर्ण सरकारच दगाबाज असतं. उदाहरणार्थ, एखाद्या देशातील माहिती तंत्रप्रणालीचा खेळखंडोबा करणे किंवा सार्वजनिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणे अथवा सरकारच उलथवणे ! काही धर्मांध संस्थांची दगाबाजी ही अत्यंत क्रूर स्वरूपाची असते. या संस्था पूर्णपणे विधीनिषेधशून्य असतात. चौथा प्रकार हा ‘रोबोटिक’ दगाबाजांचा असतो. अर्थात यांचा यंत्रवत वापर दगाबाजीसाठी केला जातो. धर्म, संस्कृती, पंथ, समाज, पवित्र ग्रंथ, जुन्या अस्मिता, अन्याय व शोषण झाल्याचे खरेखोटे प्रकार वापरून या यंत्रमानवांना हिप्नोटाईज (संमोहित) केलं जातं आणि मग दगाबाजीची कृत्ये करवून घेतली जातात. या प्रकारात विशेषतः तरुणांचा व किशोरवयीन मुलांचा मोठा वापर केला जातो. दगाबाजीला “पवित्र कर्तव्या”चं एकदा नाव चिटकवलं आणि स्वर्गप्रवेशाची खात्री पटवून दिली की ही संमोहित मंडळी काहीही करायला तयार असतात.
दगाबाजीचा पाचवा प्रकार हा चतुर व सतर्क सज्जनांनी दगाबाजांविरूद्ध केलेला असतो. एक अत्यंत सज्जन महाराष्ट्रीय उद्योजकाचं कुटुंब उद्योगातील स्पर्धकांच्या दगाबाजीने खूप त्रस्त होतं. कुटुंबप्रमुख हे हरिश्चंद्राचा अवतार. माझ्याकडे सल्ला घ्यायला आले तेव्हा मी त्यांना कृष्णाचं उदाहरण दिलं. त्यांच्या कपटी दगाबाज स्पर्धकांना धोबीपछाड लावण्यासाठी मग आम्ही “प्रतिक्रियात्मक दगाबाजी”ची व्यूहरचना वापरली. थोड्याच कालावधीत या स्पर्धकांची दगाबाजी थांबली. अर्थात मी या सज्जन गृहस्थांना सतत सतर्क रहाण्याबद्दल सांगितलं. सज्जनांनी स्वतःचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून प्रसंगी “सचोटीतील लवचिकता” वापरायला हवी. दगाबाज शत्रू जर बलाढ्य असेल तर कावेबाजपणे गनिमी कावा हा वापरावाच लागतो. महाभारतातला शकुनी व जरासंध आणि इतिहासातील अफझलखान व औरंगजेब ही निष्ठूर, बलवान व कपटी दगाबाजांची उदाहरणे आम्हास माहीत आहेत. यांचा निःपात करणारे कृष्ण व शिवराय चतुर व सतर्क होते म्हणून त्यांच्या व्यूहरचना या अजोड व यशदायी असायच्या.
वाईट उद्देशांसाठी दगाबाजी करणारे हे सामान्यतः अगदीच भित्रे, गुणवत्तेच्या बाबतीत कमअस्सल, कपटी व टोकाचे खोटारडे असतात. यांना स्वतःच्या लायकीपेक्षा अधिक कौतुक, सत्ता, धन व अन्य गोष्टी हव्या असतात. दगाबाजी करणाऱ्यांची एक ताकतवर साखळी असते जी कुठेही , कोणतीही वाच्यता न करता शिताफीने आपला कार्यभाग साधत असते. बऱ्याच परिवारांची तर पिढ्यानपिढ्यांची दगाबाजीची परंपरा असते. इथे जणुकांमध्ये दगाबाजी इतकी भिनलेली असते की टोकाच्या लोभापायी एक भाऊ दुसऱ्या भावाशी बेमालूमपणे दगाबाजी करतो किंवा सख्खा मुलगा आपल्या बापालाच दगाफटका करतो. इथे दगाबाजीचा खेळ खेळणाऱ्यांना वात्सल्य, निर्मळ प्रेम व त्याग या गोष्टी अगदीच अनावश्यक वाटतात. काही अध्यात्मिक वा धार्मिक संस्थांमध्ये गुरु – शिष्यांमध्येही दगाबाजीचे प्रसंग होतात जे संस्थांतर्गत दाबले जातात. गुरु द्रोणाचार्यांनी जेव्हा निरागस एकलव्याचा अंगठा मागून घेतला तेव्हा अखिल विश्वाला जाणवलं की एखादा समर्थ गुरु सुद्धा घाबरून शिष्याशी दगाबाजी करु शकतो !
(लेखक डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत आहेत. आपल्या अनुभवांच्या आधारे वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या विचारांसाठी ते ओळखले जातात)
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.
सर.आपले लेख प्रत्येक भारतीय ांना विचार करायला प्रवृत्त करतात.
असाच आपल्या अनमोल विचाराचा ठेवा आम्हांला मिळावा.