मुक्तपीठ टीम
सध्या मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत ६१ गोवरचे सक्रिय रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा ४ इतका झाला आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. त्यामुळे मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान गोवर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आणि लहान मुलांना हा आजार होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया…
गोवर रोग काय आहे?
- गोवर हा विषाणूद्वाके वेगाने पसरणारा संसर्ग आहे.
- या आजारास इंग्लिश मध्ये मिजल्स किंवा रुबीयोला असे म्हटले जाते.
- गोवर हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये आढळतो.
- खोकला आणि शिंका यातून गोवरचे विषाणू हवेत पसरतात.
- हा विषाणू प्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो आणि नंतर खोकला किंवा सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो.
गोवरची लक्षणे-
- सुरुवातीला १०४ अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला आणि सर्दी होते.
- डोळ्याची जळजळ, लाल होणे किंवा पाणीदार डोळे
- २ ते ३ दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात.
- त्याच वेळी, ३ ते ५ दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात.
- गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानांवर, खोडावर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकते.
- रुग्णाला भूक न लागणे, थकवा जाणवणे, हात पाय दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.
गोवर झाल्यास काय उपचार करावे?
- मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे २ डोस दिले जातात.
- पुरेसा आराम करावा.
- संक्रमितांपासून दूर रहावे.
- पाणी आणि ज्यूस प्यावे.
- मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी.
- बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.