डॉ.गणेश गोळेकर
महापुरुष ही आराध्य दैवते, राज्याच्या – देशाच्या अस्मितेचे परमोच्च मानबिंदू प्रतीके आहेत. शिवराय आपल्या नसानसात स्पुल्लिंग बनून आहेत. आपल्या रक्ताचे पाणी आणि हाडाचे काडे करून, अहोरात्र राबून, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देवून मावळ्यांनी ही स्वराज्याची दौलत उभी केली आहे. अठरा पगड जाती-जमातींना सोबत घेऊन हे महाकाय साम्राज्य छत्रपतींनी विस्तारले. हे करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये याची काळजी घेणारे शिवराय. शिवरायांचे नाव उच्चारताच आपला माथा आदराने लवतो. हात कृतज्ञतेने जोडले जातात. आणि ओठांवर शब्द येतात, “दिव्यत्वाची जिथं प्रचिती, तेथ कर माझे जुळती…….” काय कारण की, इतकी वर्षे झाली तरी शिवराय आपल्या हृदयात विराजमान झाले आहेत. छत्रपती शिवरायांचे नुसते नाव उच्चारले तरी बाहु स्फुरतात. डोळ्यात एक वेगळीच चमक दिसून येते. ज्यांच्यामुळे अनेक पिढ्या घडतात. ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचे धडे देशातीलच नव्हे तर सातासमुद्रापार व्यवस्थापनाचे विद्यार्थी गिरवीत आहेत. नव्हे आजच्या काळाला मार्गदर्शक असाच महान विचार त्यांचे. मात्र अलिकडच्या काळात महापुरुषांचा अवमान करायचा आणि प्रसिद्धी झोतात यायचे हे समिकरणच बनले आहे. कोणी जाहिर भाषणांमधून, कोणी साहित्यातून तर कोणी चित्रपटांच्या माध्यमातून महान, तेजोवलयी इतिहास मोडून -तोडून, अतिरंजित करुन किंवा स्वतः चे त्यात घुसडून माथी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कुठल्यातरी कपोलकल्पित साधनांचा आधार घेऊन दैदिप्यमान इतिहासाची वेगळी मांडणी करण्याचा अयशस्वी तोकडा प्रयत्न करीत आहेत. या खोटेपणा मुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही तथाकथित या बाबींचे उघड उघड समर्थन करीत आहेत. समाजात दुफळी निर्माण करून आपले इप्सित साध्य करण्याचा काहींचा मानस दिसतोय. या प्रवृत्तीला रोखण्यासाठी आजचे कायदे कमी पडत आहेत. सेन्सॉर बोर्ड कथानकाची थीम पाहून चित्रपटाला मान्यता देत आहे. ऐतिहासिक चित्रपट असतील तर फक्त मनोरंजनाचे साधन नसते. तर त्यात ऐतिहासिक वारसा, वास्तू, संस्कृती, अस्मिता, जिवंतपणा असतो याचा विसर सेन्सॉरशिप देणा-या यंत्रणांना देखील पडतो. काही बाबींचे निरीक्षण केले असता जाणून-बुजून हे होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. इतिहासाचा ‘इ’ माहित नसलेली काही फुटकळ लोकं आपल्या बुद्धीच्या कुवतीपेक्षा जास्त बोलतात, तेव्हा आपण काय आणि कोणाबद्दल बोलतो याचे भान त्यांना राहात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचा नंगानाच सुरू आहे. सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली नाही ते दाखवण्याचा उपद्व्याप काही मंडळी करीत आहेत. अशांचा विशेष कठोर कायद्याद्वारे प्रतिबंध केला पाहिजे. इतिहासाच्या साधनावर पोट भरणाऱ्या काही विकृती इतिहासच बदलायला निघाल्या आहेत. नव्हे जाणूनबुजून वाद वाढतील, माथे भडकतील असा चिथावणीखोर खोटा इतिहास मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे.
शिवछत्रपतींवर चित्रपट येणार म्हटल्यावर कोणत्याही शिवप्रेमींना आनंदच होणार. ते त्या चित्रपटाला डोक्यावरच घेणार. हे अनेक वेळा घडलेले आहे. मात्र काही चित्रपटांना शिवप्रेमीच विरोध करतात म्हणजे नक्कीच त्यात विरोधाभास भरलेला दिसतो. ओढूनताणून त्यात चुकीच्या बाबींचा समावेश केला हे निश्चित. महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे, अमोल कोल्हे, गिरीश कुबेर यांसारख्या साहित्यीक-कलाकार-निर्माते-दिग्ददर्शकांनी याची सुरुवात केंव्हाच केलेली आहे. अठरा पगड जाती-जमातींना मिळून छत्रपतींनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. देशाच्या राष्ट्रगीत सुद्धा पंजाब, सिंध, गुजरात, मराठा असा अभिमान वाचक उल्लेख आढळतो. मग ‘मराठा साम्राज्य’ हे ‘मराठी साम्राज्य’ कसे तयार झाले यांचे उत्तर कोण देणार? मराठा हा याठिकाणी जातिवाचक नसून अभिमानाचे प्रतीक आहे. या प्रतिकाचा काहींना त्रास होतोय असे अनेक बाबींतून जाणवते. २००९ साली ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ते २०२२ च्या ‘हर हर महादेव’ मध्ये ‘सुद्धा मराठा साम्राज्य’ हे ‘मराठी साम्राज्य’ दाखवण्यात षडयंत्राचा भाग दिसतोय. मावळ्यांच्या तोंडी अश्लील शब्द घालण्यात आलेले आहेत. अफजलखान वधाच्या वेळी सोईस्कर रित्या दोन खांब दाखवण्यात आलेले आहेत. काय तर या खांबातून नृसिंहाप्रमाणे शिवरायांची इन्ट्री दाखवून हिरण्यकश्यपू प्रमाणे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला हे दाखवायचे असते. अफजलखान हा विदेशी सरदार, तो स्वराज्यावर चालून आला म्हणून महाराजांनी वाघनख्याच्या सहाय्याने टराटरा पोट फाडले हे जगद्विख्यात सत्य नाकारून महाराजांचे दैवतीकरण, मनुवादाला असर दाखवण्याचा तोकडा प्रयत्न ‘हर हर महादेव’ च्या माध्यमातून झालेला आहे. जावळीच्या खो-यात अफजलखानाला येण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी बाजीप्रभूच्या माणसांनी रत्याच्या कडेला मंदिरे उभारली. विशेष बाब म्हणजे ती खोटी होती. ती मंदिरे नासधूस करीत करीत अफजलखान जावळीच्या खो-यात येणार होता. विशेष बाब म्हणजे ती मंदिरे खोटी होती. मंदिरे खोटी असू शकतात किंवा त्यात खोटे म्हणजे काय हे आत्यचिंतनिय आहे. समझणेवालें को इशारा काफी असेच याबाबत म्हणता येईल.
‘मराठे कुणबी काही ‘होण’ मध्ये आपल्या स्त्रिया विकत होते’ या बाबा पुरंदरेच्या वाक्याचा संदर्भ घेऊन चित्रपटात तो स्त्रियांच्या बाजाराचा प्रसंग शिवछत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरणच ठरते. यात दाखविलेली पावनखिंड म्हणजे निर्मात्यांच्या बुद्धिची किव करण्यासारखीच.
‘हर हर महादेव’ मधील काही प्रसंग फक्त नमुने आहेत. अशा कलाकृती निर्माण करणा-या आणि खरं-खोटं न जाणता त्याचे आंधळे समर्थन काही विकृती इतिहासच बदलायला निघाल्या आहेत. शिवप्रेमींचा विरोध खोटेपणाला आहे. त्यात दुरूस्त्या करुन अभिजित देशपांडे सारख्यांनी चित्रपट नव्याने आणला तर त्याचे स्वागतच केले जाईल. मात्र इतिहासाचे विकृतीकरण कोणताही सच्चा शिवप्रेमी अजिबात सहन करणार नाही. अशा चित्रपटावर शिवप्रेमी बहिष्कार टाकत असतील किंवा बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत असतील तर त्यात वावगे काय? किमान यामुळे भविष्यात इतिहासाचे विकृतीकरण थांबविले जाईल किंवा चित्रपटच चालला नाही तर कोणताही निर्माता चुकीचा इतिहास दाखवणारा चित्रपट निर्माण करण्याचे धाडस करणार नाही. अशी ऐतिहासिक चित्रपटे तयार करताना शासनाने सुद्धा तज्ञ लोकांची समिती बनवून त्यावर अभिप्राय नोंदवून नंतरच सेन्सॉरशिप दिली पाहिजे. सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्यांचे मनसुबे यामुळे अगोदरच उधळून लावले जातील. सुमार दर्जाच्या कलाकृती निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हे सर्व रोखण्यासाठी कडक कायदा आवश्यक आहे.
डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर
मराठा-सेवक
छत्रपती संभाजीनगर