अश्विनी नांदेडकर
मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्त पुरोगामी माणुसकीने समृद्ध आणि सर्वसमावेशक मराठी रंगभूमीसाठी “थिएटर ऑफ रेलेवन्स” शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गोधडी” प्रस्तुत करणार आहेत.
गोधडी म्हटलं की डोळ्यासमोर तरळतात अनेक आठवणी. या आठवणी प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जातात. माती व प्रकृती सह मनुष्याच्या नात्याला आणि त्या नात्यातील विचारांच्या धाग्याला उलगडते ही गोधडी !
बालपणात गोधडी शिवणारी आजी आणि आई यांच्या आठवणी, या आठवणींच्या अनुषंगाने येतात ते संस्कार आणि आपली संस्कृती. काय असते ही संस्कृती? कधी या प्रश्नांचा विचार केला आहे का? याची व्याख्या किंवा यावरती अनेक संभाषण, व्याख्यानं झाली असतील . पण नवीन शोधाची सुरवात अभावानेच होते. प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगताना संस्कृतीचा आधार घेते. एकमेकांशी असलेली नाती टिकवण्यात किंवा निर्माण करण्यात संस्कृतीचा आधार असतो. मुलांना वाढवण्यात त्यांचे संगोपन करण्यातही आपली संस्कृती असे मानाने आपण मिरवतो. पण सांस्कृतिक वर्चस्ववादाला कधी प्रश्न विचारत नाही.आणि वर्षानुवर्षे,पिढीदर पिढी आपण संस्कृतीच्या नावाखाली रुढीवादी परंपरेच्या शोषण चक्रात शोषित होत राहतो. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत “गोधडी”या नाटकातून परंपरेच्या जडत्वाला खोडून मानवी चैतन्याचा प्रवाह सृजित करत आहे.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”
“गोधडी” भारताचा आत्मा आहे. भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते. या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक “गोधडी”!
प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला ‘कला’ म्हणतात.
सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते ‘कला’. ‘रंगकर्म’ सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.
मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे “जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते” मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरोगामी माणुसकीने समृद्ध आणि सर्वसमावेशक मराठी रंगभूमीसाठी “थिएटर ऑफ रेलेवन्स” शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गोधडी” वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल ५ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी, सकाळी ११.३० वाजता,प्रस्तुत करणार आहेत.
प्रेम,सदभाव,माणुसकीच्या कलात्मक धाग्यांनी विणलेली गोधडी प्रस्तुत करणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, आरोही बाविस्कर हे आहेत.
(अश्विनी नांदेडकर या थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिध्दांत रंगकर्मी आहेत.)