मुक्तपीठ टीम
घराणेशाहीचे राजकीय पक्ष देशातील लोकशाहीला दुबळी बनविण्याचे काम करीत आहेत, असे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले आहे.
पश्चिम नागपूर (बजाजनगर) ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या साप्ताहिक कार्यक्रमात ‘राजकीय घराणेशाही’ या विषयावर ते बोलत होते. मंडळाध्यक्ष डाॅ. सुधीर बोधनकर यावेळी अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रीय स्तरावर काॅंग्रेस हा घराणेशाहीवादी पक्षच आहे, असे आकडेवारीने सांगताना देशमुख म्हणाले की, काॅंग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात नेहरू-गांधी या एकाच परिवाराच्या ६ जणांनी ४८ वर्षे अध्यक्षपद आणि त्यातीलच तिघांनी पंतप्रधानपद ३८ वर्षे उपभोगले.
याला लोकशाही म्हणायचे का ?
काॅंग्रेसपासूनच प्रेरणा घेऊन बादल (पंजाब), अब्दुल्ला (काश्मीर), लालूप्रसाद यादव (बिहार), मुलायमसिंग यादव (उत्तर प्रदेश), करुणानिधी (तामिळनाडू), पवार, ठाकरे (महाराष्ट्र) आदी कुटुंबांच्या नेत्यांनी आपापल्या प्रादेशिक पक्षांद्वारे वर्षानुवर्षे घराणेशाही जोपासली. त्यामुळे शतकाकडे वाटचाल करणारी आपली लोकशाही खिळखिळी होत आहे.
विद्यमान घराणेशाह्यांचे समर्थक इतर पक्षातील नातेसंबंधाच्या काही उदाहरणांकडे बोट दाखवून धूळफेक करतात. मुळात पक्षप्रमुख किंवा त्यांचे निकटचे नातेवाईक कायम सूत्रधार राहणे हे घराणेशाहीचे मुख्य लक्षण असते, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले आणि फसव्या युक्तिवादाला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंडळाच्या सचिव मृदुला पंडित यांनी केले. रा.स्व. संघाचे सोमलवाडा भाग संघचालक स्व. सुधीर वऱ्हाडपांडे यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.