मुक्तपीठ टीम
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपविधी ३० जून रोजी झाला होता, तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र अखेर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला आहे. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारला शेजारील राज्यातील एका मुख्यमंत्र्याचा विक्रम मोडता आलेला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी चक्क ६८ दिवस एका मंत्र्यासह आपले सरकार चालवले होते. त्यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) – काँग्रेस सरकार पडल्यानंतर २६ जुलै २०१९ रोजी सत्तेत परतल्यावर तीन आठवडे म्हणजे २८ दिवस केवळ एकट्याने सरकार चालवले. तो दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम मात्र मोडला आहे.
तेलंगणात ६८ दिवस होते फक्त दोघांचे मंत्रिमंडळ!
- तेलंगणात, दोन महिन्यांहून अधिक काळ मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गृहमंत्री म्हणून केवळ एक कॅबिनेट सहकारी मोहम्मद महमूद यांच्यासोबत आपले सरकार चालवले.
- राव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या दणदणीत विजयानंतर १३ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .
- परंतु दोन महिन्यांहून अधिक काळ म्हणजे ६८ दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही.
- राव यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी आणखी १० सदस्यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.
येडियुरप्पा यांनी तीन आठवड्यांनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला!!
- २६ जुलैला येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २९ जुलै २०१९रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. पण तीन आठवड्यानंतर २८ दिवसांनी ते २० ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकले.
- जातीय आणि प्रादेशिक समीकरणे व्यवस्थापित करण्यास वेळ लागल्याने त्यांना तीन आठवड्यांनंतर मंत्रिमंडळ विस्तार करता आला.
- राज्यात लिंगायत समाजाचे ३९ आमदार असल्याने जातीय समीकरणाचे मोठे आव्हान होते.
- मुख्यमंत्रीही लिंगायत समाजाचे होते.
- राज्यात लिंगायत हा भाजपाचा सर्वात मोठा आधार आहे.
- काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पाडण्यास मदत करणाऱ्या १७ अपात्र काँग्रेस आणि जेडी(एस) आमदारांपैकी बहुतांश आमदारांनाही सरकारमध्ये ठेवावे लागले.