मुक्तपीठ टीम
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा धुळे येथे कार्यगौरव समारंभात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम, कुलगुरु डॉ. विजयकुमार माहेश्वरी, अँड. एम. एस पाटील, अँड. बाप्पुसाहेब जे.टी. देसले, सत्यशोधक किशोर ढमाले, नाटककार शंभु पाटील, आर्कीटेक्त चेतन सोनार, वासंती दिघे, बी.एस.पाटील, डाँ.संजय पाटील आदी उपस्थित होते. समविचारी संस्था संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाविद्यालयीन जीवनापासून छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे अविनाश पाटील! यांचा सामाजिक जीवनातील कार्यप्रवास ३७ वर्षांहून अधिक राहिला आहे. त्यातील २६ वर्षे ते पूर्णवेळ कामात आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेच्या आधीपासून ते या चळवळीत आहेत. सुरुवातीची दोन वर्षे अमळनेर शाखा संघटक, संघटनेच्या नवीन संरचनेत तीन वर्षे जळगाव जिल्हा कार्यवाह, सहा वर्षे राज्य सहकार्यवाह, बारा वर्षे राज्य कार्यवाह होते. दाभोलकर असतानाच २०१० साली त्यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आणि पुढे त्यांनी बारा वर्षे राज्य कार्याध्यक्ष पदाची धुरा संभाळली. अशा आपल्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वीतेची विशेष मोहर उमटवणाऱ्या अविनाश पाटील यांच्याकडे आता राज्य अध्यक्ष पदाची धुरा आली आहे.
“महाराष्ट्र अंनिस संघटनेला अविनाशसारखे समर्थ नेतृत्व आहे”, असे म्हणणाऱ्या भाई एन डी पाटील यांच्याकडे असलेले अध्यक्षपद त्यांच्या निधनानंतर आता अविनाश पाटील यांच्याकडे आले आहे, ते नक्कीच एन डी सरांच्या मनातील संघटनेचा रोड मॅप विस्तारतील, यात शंका नाही. १९८५-८६ पासूनच्या महाविद्यालयीन जीवनात आणि १९९० ते १९९६ या सात वर्षात बांधकाम व्यवसाय करत असतानाही ते सामाजिक कामात सक्रिय होते. पुढे १९९६ पासून ते स्वतःचा चांगला चाललेला व्यवसाय बंद करून पूर्णवेळ महाराष्ट्र अंनिसच्या कामात आले. शालेय महाविद्यालयीन जीवनातील उत्कृष्ट क्रिकेटर, पुढे बांधकाम व्यवसायिक आणि ते सर्व सोडून देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता हा थक्क करणारा प्रवास आहे. संघटक कार्यकर्ता असलेल्या अविनाश पाटील यांना पुढील कार्यप्रवासासाठी मनःपूर्वक सदिच्छा!