मुक्तपीठ टीम
भारताच्या तेजस या लाइटवेट लढाऊ विमानाची परदेशातील लोकप्रियता वाढते आहे. मलेशियाही या विमानावर पसंतीची मोहर उमटवण्याची शक्यता आहे. आग्नेय आशियातील या देशाला आपली जुनी लढाऊ विमाने बदलायची आहेत. त्याच्या बदली मलेशियाने भारताच्या तेजसलाही यादीत वर ठेवलं आहे. चीनी आणि कोरियन विमानांचे पर्याय असताना मलेशियाने उचललेलं हे पाऊल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALच्या शिरपेचात मानाचा ग्लोबल तुरा खोवणारं आहे.
HAL निर्मित तेजसने प्रतिस्पर्धी चीनी आणि दक्षिण कोरियाच्या विमानांना मागे टाकले आहे. चीनी विमान जेएफ-१७, दक्षिण कोरियाचे विमान एफए-५० आणि रशियाचे मीग-३५ आणि याक-१३० यांच्याशी तीव्र स्पर्धा असतानाही मलेशियाने तेजसवर विश्वास ठेवला आहे. तेजस विमानाबाबत बोलणी सुरू आहे जेणेकरून, खरेदी प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकेल.
HALचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आर माधवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोवर लादलेल्या निर्बंधांमुळे मलेशियाला रशियाकडून खरेदी केलेल्या एसयू-30 विमानांचे भाग खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. भारताने पॅकेजचा भाग म्हणून मलेशियामध्ये एमआरओ देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा उभारण्याची ऑफर दिली आहे. हा मोठा करार लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे.
‘तेजस’ चिनी जेएफ-१७ आणि एफए-५० पेक्षा अधिक शक्तीशाली
- चिनी जेएफ-१७ स्वस्त होते, पण ते तेजस एमके-१ए प्रकारातील तांत्रिक बाबी आणि भारताने देऊ केलेल्या एसयू-30 फ्लीट मेन्टेनन्सशी स्पर्धा करू शकले नाही.
- खरेदी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी आणि तज्ञांचे एक पथक लवकरच भारतात येण्याची अपेक्षा आहे.
- तेजस हे जेएफ-१७ आणि एफए-५० पेक्षा खूपच चांगले विमान आहे आणि भारतीय विमानांच्या निवडीमुळे मलेशियाला भविष्यात त्यांच्या ताफ्यात सुधारणा करण्याचा पर्याय मिळेल.
भारतीय तेजस लढाऊ विमानांचे खास वैशिष्ट्य
- HALद्वारे निर्मित तेजस हे सिंगल इंजिन आणि अत्यंत सक्षम मल्टी-रोल फायटर विमान आहे, जे अति-धोकादायक हवेच्या वातावरणात कार्य करण्यास सक्षम आहे.
- गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी HALसोबत ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
- भारताने तेजसच्या एमके-२सह पाचव्या पिढीचे Advanced Medium Combat Aircraft विकसित करण्यासाठी यूएसडी ५ बिलियनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू केले आहे.